अंबाबाई मंदिराची पाहणी
By admin | Published: February 23, 2017 12:48 AM2017-02-23T00:48:03+5:302017-02-23T00:48:03+5:30
विभागीय आयुक्तांची भेट : अहवाल नगरविकास विभागाकडे पाठविणार
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मंदिर व परिसराची तसेच व्हीनस कॉर्नर येथील प्रस्तावित पार्किंग व यात्री निवासाच्या जागेची पाहणी केली. या पाहणीचा स्वतंत्र अहवाल येत्या दहा दिवसांत राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा २५० कोटींचा असून पहिल्या टप्प्यात ७५ कोटींची विकासकामे करण्यात येणार आहे. सदर आराखड्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत व बाह्ण परिसराची सुमारे दोन तास पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, वास्तुविशारद तज्ज्ञ अमरजा निंबाळकर, इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक बी. बी. बिराजदार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, अभियंता सुदेश
देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
दुपारी चारच्या दरम्यान विभागीय आयुक्तांनी मंदिराची पाहणी सुरू केली. महापालिकेने पूर्वी प्रस्तावित केलेल्या विद्यापीठ दरवाजा येथील दर्शन मंडपाची जागा व नव्याने सुचवण्यात आलेल्या फरासखान्याची इमारत त्यांनी पाहिली व पूर्वी असा चुकीचा प्रस्ताव का दिला गेला, अशी विचारणा करीत दोन्ही पर्यायांची तौलनिक माहिती घेतली. मंदिरातील नगारखाना, मनकर्णिका कुंड परिसर, घाटी दरवाजा, मंदिराचा ढाचा आणि जतन संवर्धनासंबंधीची सूक्ष्म माहिती घेतली.
तत्पूर्वी त्यांनी व्हीनस कॉर्नर येथील बहुमजली पार्किंग व त्यावर उभारण्यात येणाऱ्या यात्री निवासाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिराचे करण्यात येत असलेले स्ट्रक्चरल आॅडिट, डिजिटायझेशन या सगळ्या प्रक्रिया सुरू ठेवण्याची सूचना केली. त्यांच्या या पाहणीचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नगरविकास विकास विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात येणार आहे.