बालिंगा, नागदेवाडी उपसा केंद्राची प्रशासक बलकवडे यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:37+5:302021-07-27T04:25:37+5:30
कोल्हापूर : बालिंगा व नागदेवाडी पाणी उपसा केंद्रांना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी सकाळी भेट दिली. शहराचा पाणीपुरवठा ...
कोल्हापूर : बालिंगा व नागदेवाडी पाणी उपसा केंद्रांना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी सकाळी भेट दिली. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी करून मंगळवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अतिरिक्त नितीन देसाई, जल अभियंता अजय साळुंखे उपस्थित होते.
बलकवडे यांनी कळंबा फिल्टर हाऊस येथून पाणी भरून पाठविण्यात येणाऱ्या टँकरच्या नियोजनाची पाहणी केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. तसेच टँकरद्वारे भागामध्ये देण्यात येणाऱ्या पाण्याच्या वाटपाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी नागरिकांनी गर्दी न करता पाणी भरून घ्यावे. सर्वांनी मास्क लावावे अशा सूचना दिल्या.
- खासगी टँकरला नागरिकांनी पैसे देऊ नयेत-
महापालिकेने स्वत:च्या टँकरव्यतिरिक्त इतर टँकर भाड्याने घेतले आहेत. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था, मंडळे या सर्वांना कळंबा फिल्टर हाऊस येथून मोफत पाणी भरून दिले जाते. याशिवाय याठिकाणी काही खासगी टँकरवालेही पाणी भरतात. काही खासगी टँकरवाले महापालिकेच्या केंद्रातून पाणी भरून घेऊन बाहेर विकत पाणी असल्याच्या तक्रारी येत आहेत. या टँकरवाल्यांना महापालिका मोफत पाणी भरून देत असल्याने कोणत्याही नागरिकांनी त्यांना पैसे देऊ नयेत, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो क्रमांक - २६०७२०२१-कोल-बालिंगा पंपिंग
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी बालिंगा व नागदेवाडी पंपिंग स्टेशनची पाहणी केली.