पार्वती औद्योगिक वसाहतीत भरारी पथकाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:07+5:302021-04-22T04:25:07+5:30
पार्वती औद्योगिक वसाहतीत भरारी पथकाकडून तपासणी * पहिल्या टप्प्यात ७७ उद्योगांची तपासणी यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील उद्योग ...
पार्वती औद्योगिक वसाहतीत भरारी पथकाकडून तपासणी
* पहिल्या टप्प्यात ७७ उद्योगांची तपासणी
यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील उद्योग शासनाने घालून दिलेल्या निकषानुसार सुरू आहेत का, याची पाहणी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या भरारी पथकाकडून अचानकपणे तपासणी करण्यात आली. यामध्ये बुधवारी एकूण ७७ उद्योगांपैकी २१ उद्योग शासन नियमानुसार चालू, तर ५६ उद्योग बंद असल्याचे आढळून आले. उर्वरित उद्योगांची तपासणी अद्याप होणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर वरिष्ठ पथक पुन्हा तपासणीस येणार आहे. ब्रेक द चेनसाठी शासनाकडून कडक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने उद्योगासाठी नियमावली तयार केली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार दहा पथके नेमून जिल्ह्यातील सर्व उद्योग नियमांची अंमलबजावणी करतात का, याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे नोडल ऑफिसर सतीश शेळके, कार्यकारी अभियंता सुभाष मोरे व सहायक अभियंता इ. जी. पाटील यांच्या नियंत्रणाखाली पथके तैनात करण्यात आली आहेत.
शिरोळ तालुक्यासाठी सहायक अभियंता विजय पाटील, मनोहर जारपोळे यांचे पथक तपासणी मोहीम राबवित आहे. या पथकाकडून झालेल्या तपासणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येणार असून, पुढील दोन दिवसात वरिष्ठ पथकाकडून या उद्योगांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.
फोटो - २१०४२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये शासन नियमांची अंमलबजावणी सुरू आहे की नाही, याची तपासणी भरारी पथकाकडून करण्यात आली.