कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराची पुरातत्वच्या संचालकांकडून पाहणी, लवकरच सुधारणा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 01:57 PM2022-12-07T13:57:38+5:302022-12-07T13:58:06+5:30
मंदिराच्या मूळ रूपाचे जतन संवर्धन व अन्य डागडुजीसंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काही दिवसांपूर्वी सविस्तर अहवाल विभागाला पाठवला होता.
कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या जतन संवर्धनासाठी व मूळ सौंदर्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अपेक्षित असलेल्या परवानग्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू, मंदिरावरील रंग, चुना काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा पुरवू, अशी ग्वाही भारतीय पुरातत्व विभागाच्या संचालिका नंदिनी साहू यांनी मंगळवारी दिली.
मंदिराच्या मूळ रूपाचे जतन संवर्धन व अन्य डागडुजीसंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काही दिवसांपूर्वी सविस्तर अहवाल विभागाला पाठवला होता. त्या अनुषंगाने त्यांनी मंदिराची पाहणी केली. आज बुधवारी त्या खिद्रापूरची पाहणी करणार आहेत.
अंबाबाई मंदिराच्या वास्तू सौंदर्याचे जतन करण्याचे काम देवस्थान समितीकडून सुरू असून, मूळ दगडी भिंतीवरील फरशी काढल्यानंतर आता त्यावरील रंग, चुना काढायचा आहे. गरूड मंडपाचा छत खाली आला आहे, नगारखान्याच्या वरच्या मजल्याची दुरवस्था झाली आहे.
मूळ मंदिराच्या छताला गळती आहे. काही ठिकाणी दगडांची अडत सुटली आहे. सिमेंट काँक्रीटचा थर आहे. मंदिराच्या बाह्य बांधकामावरील मूर्तींची अवस्था नाजूक झाली आहे. ६४ योगिनींच्या मूर्तिंचेही जतन करावे लागणार आहे. मणिकर्णिका कुंडाचे काम थांबले आहे. या सगळ्या कामांबाबतचा सविस्तर अहवाल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुरातत्व खात्याला पाठवला होता. त्यानंतर साहू यांनी अंबाबाई मंदिराची पाहणी केली.
यावेळी समितीच्या वतीने शिवराज नाईकवाडे यांनी पुरातत्वची एक व्यक्ती देवस्थान समितीला मिळावी तसेच समितीच्या वतीने पाठवण्यात येत असलेल्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी विनंती केली.