कोल्हापूर जिल्हा बँकेची नाबार्डकडून तपासणी, ‘ईडी’ने तपासलेलेच मुद्दे केंद्रस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 02:20 PM2023-04-27T14:20:40+5:302023-04-27T14:21:06+5:30
गेली तीन दिवस नाबार्डच्या दोन अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गेली तीन दिवस नाबार्डच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. ही तपासणी नियमित असल्याचे सांगण्यात येत असले तरी ‘ईडी’ ने तपासणी केलेल्या मुद्द्यांभोवतीच ही तपासणी केल्याचे समजते. यामध्ये बँकेने साखर कारखान्यांना केलेल्या कर्जपुरवठ्यावर ‘ईडी’ आक्षेप असल्याने त्यावर नाबार्डची नजर असून, नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवस तपासणी केल्यानंतर बुधवारी ते मुंबईला रवाना झाले.
जिल्हा बँकेने ब्रिक्स कंपनी व संताजी घोरपडे साखर कारखान्याला दिलेले कर्जाबाबत ईडीचा आक्षेप आहे. त्यांच्या तपासणीत काही मुद्दे समोर आले आहेत. ‘नाबार्ड’ व रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी तपासणी होते, शासकीय लेखापरीक्षण होते. या सगळ्यांच्या तपासणीत जे सापडले नाही ते ईडीला कसे सापडले, असा सवाल बँकेकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गेली तीन दिवस नाबार्डच्या दोन अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
या कालावधीत त्यांनी विशेष म्हणजे ब्रिक्स कंपनी व संताजी घोरपडे साखर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याबाबत तपासणी केल्याचे समजते. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी ज्या दिशेने तपासणी केली, त्यानुसारच त्यांनी तपासणी केल्याची माहिती समोर आली असून, तपासणी पूर्ण करून बुधवारी सायंकाळी हे अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.
साखर कारखान्यांना केलेल्या कर्जपुरवठ्याबाबत ‘ईडी’ने नोंदवलेले आक्षेप, त्यावर न्यायालयात सुरू असलेला वाद-प्रतिवादाच्या पार्श्वभूमीवर नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी केलेली तपासणी, महत्त्वपूर्ण मानली जात आहे.