Election: जिल्हा परिषदेच्या गट-गण रचनेची तपासणी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 11:32 AM2022-05-09T11:32:35+5:302022-05-09T18:59:41+5:30
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरील सुनावणीत जिल्हा परिषदेसह महानगरपालिकांची निवडणूक जाहीर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट व गण रचना निश्चित करण्यासाठी प्रारूप आराखड्याची रविवारी मुंबईत निवडणूक आयोगासमोर तपासणी पूर्ण झाली. आता ही रचना अंतिम करून नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरील सुनावणीत जिल्हा परिषदेसह महानगरपालिकांची निवडणूक जाहीर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उपायुक्त अविनाश सणस यांनी अधिसूचना जारी करत प्रभाग रचना तपासणी कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नकाशे गुगल मॅपवर कंपोज करणे, जनगणनेची आकडेवारी लिंक करणे आदी कामांसाठी प्रभाग रचनेचे कामकाज हाताळणारे अधिकारी, कर्मचारी अशा दोघांनी सर्व कागदपत्रांसह निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतची नोटीस काढली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दोन कर्मचारी ही माहिती घेऊन मुंबईत गेले होते. या माहितीत नव्या गट-गण रचनेची माहिती सादर केली, त्यानुसार जिल्हा परिषदेची गट संख्या ६७ वरून ९ ने वाढून ७६ तर पंचायत समितीची गणसंख्या १८ ते वाढून ती १५५ करण्यात आली आहे. आता ही अंतिम झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. यामध्ये मतदार यादी, प्रभाग हरकती आणि आरक्षण सोडत असे टप्पे असणार आहेत.