Kolhapur: पन्हाळा किल्ल्याच्या मराठा स्थापत्यशैलीची युनेस्कोच्या पथकाकडून पाहणी
By संदीप आडनाईक | Published: October 5, 2024 06:54 PM2024-10-05T18:54:12+5:302024-10-05T18:55:25+5:30
पन्हाळा/ कोल्हापूर : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्यासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने शनिवारी कोल्हापूर ...
पन्हाळा/कोल्हापूर : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्यासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील मराठा स्थापत्य शैलीतील विविध ठिकाणांना भेट देउन पाहणी केली. हे पथक सुमारे साडेतीन तास पन्हाळ्यावर होते. दरम्यान, किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी, स्थानिक नागरिकांशीही या पथकाने संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या १२ निवडक किल्ल्यांपैकी महत्त्वाचा असलेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा मिळेल असी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने सकाळी ८ वाजल्यापासून किल्ल्याची तटबंदी, मराठा स्थापत्य शैलीतील पडकोट, इमारती, पावनगडाची त्यांनी सखोल पाहणी केली. या पथकाने धर्मकोठी, सज्जाकोठी, अंबरखाना, तीन दरवाजा या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक आणि मराठा लष्कर स्थापत्य शैलीतील खुणांची पाहणी केली. आयकोमॉसचे आंतरराष्ट्रीय तज्ञहेवान्ग ली यांनी सोबत आणलेल्या नकाशाबरहुकूम मराठा स्थापत्याची माहिती घेतली. याशिवाय किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल त्यांनी तपशीलवार माहिती घेतली. हे पथक साडेबारा वाजेपर्यंत गडावर होते.
या पथकामध्ये हेवान्ग ली यांच्यासह एएसआयचे अतिरीक्त महानिर्देशक (जागतिक वारसा) जानवीश शर्मा, राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाचे संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, डॉ. शुभा मजुमदार यांचा समावेश होता. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली मडकर, मुख्याधिकारी चेतन माळी, पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, चेतन भोसले यांच्यासह समितीचे आर्किटेक्चर अक्षय लाड, इतिहास अभ्यासक शिवप्रसाद शेवाळे, स्मिता काशीद, शीतल घाटगे, मिलिंद बांदिवडेकर यांनी भाग घेतला.