महापौर, आयुक्तांकडून ‘झूम’ची पाहणी

By admin | Published: January 26, 2017 12:50 AM2017-01-26T00:50:25+5:302017-01-26T00:50:25+5:30

उद्या महापालिकेत बैठक : कचऱ्याच्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य

Inspector of 'Zoom' from Mayor, Commissioner | महापौर, आयुक्तांकडून ‘झूम’ची पाहणी

महापौर, आयुक्तांकडून ‘झूम’ची पाहणी

Next

कोल्हापूर : शहरातील गोळा होणारा दैनंदिन कचरा आणि वर्षानुवर्षे साचून राहिलेला विघटन न होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्याकरिता उद्या, शुक्रवारी महापालिकेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी महापौर हसिना फरास व आयुक्त पी. शिवशंकर यांनी झूम प्रकल्पावरील धुमसणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
झूम प्रकल्पातील कचऱ्याच्या ढिगांना आग लागल्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून कचरा हटविण्यात यावा तसेच लागलेली आग तत्काळ विझविण्यात यावी यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी महापौर फरास, आयुक्त शिवशंकर, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, नगरसेविका माधुरी लाड यांनी भेट देऊन पाहणी केली.
महापौर आल्या आहेत म्हटल्यावर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आणि त्यांच्याकडे तक्रारी आणि होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. कचऱ्याचे ढीग पेटविला जात असल्याचा आरोप यावेळी वसंत डावरे यांनी केला. कचरा टाकण्यास जागा व्हावी म्हणून कोणी तरी रात्रीचे येऊन कचरा पेटवून देतात, परंतु त्याचा त्रास नागरिकांना होतोय. किती दिवसात तुम्ही कचरा हलविणार आहात याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
कचरा पेटल्यामुळे परिसरात झालेल्या धुराचा त्रास खुद्द महापौर व आयुक्तांनाही झाला. त्यामुळे नागरिकांचा संताप लक्षात घेऊन तातडीने उद्या, शुक्रवारी सकाळी बैठक घेण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. दरम्यान, कचरा उचलणे आणि आग विझविण्याचे नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी आयुक्तांना यावेळी दिले. (प्रतिनिधी)


सहा महिन्यांत कचरा उचलणार
झूम प्रकल्पावरील विघटन न होणारा कचरा उचलण्यासाठी अल्प मुदतीची निविदा काढण्यात आलेली आहे. येत्या दोन दिवसांत त्यानुसार काम देण्यात येईल. पुढील सहा महिन्यांत संपूर्ण कचरा या ठिकाणावरून हलविण्यात येईल. तो टाकण्यासाठी दोन जागाही निश्चित करण्यात आलेल्या आहेत, असे मुख्य आरोग्य अधिकारी विजय पाटील यांनी यावेळी सांगितले.


लाईन बाजार परिसरातील झूम प्रकल्पातील आग लागलेल्या कचऱ्याची बुधवारी महापौर हसिना फरास व आयुक्त पी. शिवशंकर यांनी पाहणी केली. यावेळी ज्ञानेश्वर ढेरे, सागर यवलुजे, माधुरी लाड, किरण शिराळे उपस्थित होते.

Web Title: Inspector of 'Zoom' from Mayor, Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.