भुदरगड तहसीलचे काम प्रेरणादायी
By admin | Published: January 7, 2015 09:01 PM2015-01-07T21:01:38+5:302015-01-08T00:01:59+5:30
कीर्ती नलावडे : गंगापूर येथे सुवर्णजयंती कार्यक्रमास प्रतिसाद
गारगोटी : शेतकऱ्यांना दाखले व इतर शासकीय कामांसाठी कार्यालयाकडे मारावे लागणारे हेलपाटे कमी करून गावातच दाखले मिळून त्यांचा होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी शासनाने सुरू केलेली सुवर्णजयंती राजस्व अभियान अंतर्गत समाधान योजना ही नावाप्रमाणेच समाधानकारकरीत्या राबविली जात आहे. त्याबद्दल भुदरगड तहसील आणि गंगापूरवासीयांचे काम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार आजरा भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी काढले.
गंगापूर (ता. भुदरगड) येथे आयोजित केलेल्या सुवर्णजयंती राजस्व अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी पशुसंवर्धन विभागामार्फत पशूंचे लसीकरण, आरोग्य विभागामार्फत विद्यार्थी व ग्रामस्थांचे आरोग्य तपासणी, तर कृषी विभागामार्फत कृषिपूरक योजनेची सविस्तर माहिती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर महसूल विभागामार्फत दुबार रेशनकार्ड, रेशनकार्डावरील नावे कमी -जास्त करणे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य धनादेश वाटप, विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात तहसीलदार शिल्पा ओसवाल, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई, ‘बिद्री’चे ज्येष्ठ संचालक पंडितराव केणे, पं. स.चे सभापती विलास कांबळे, मंडल अधिकारी पी. डी. बुजरे, सरपंच संजयराव जाधव, तलाठी कल्पना माने, ग्रामसेवक अमोल चिखलीकर, ग्रा. पं. विस्तार अधिकारी विश्वास सुतार, सदस्य तानाजीराव जाधव, बाळासाहेब केणे, अनिल गोडसे, मुख्याध्यापक रमेश कोळी, कृषी सहायक शिंदे, आदी उपस्थित होते. दयानंद म्हेतर यांनी सूत्रसंचालन केले. संजय जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)