इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन आजपासून
By Admin | Published: September 28, 2016 12:40 AM2016-09-28T00:40:20+5:302016-09-28T00:43:35+5:30
तीन जिल्ह्यांतील शाळांचा सहभाग : व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : भारत सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजतर्फे ‘जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड २०१६’ या प्रदर्शनाला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी पत्रकार परिषदेत
दिली.
महाराष्ट्र हायस्कूल येथे मंगळवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी शिंदे म्हणाल्या, ‘कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्णांतील २६१ शाळांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. शुक्रवार (दि. ३०)पर्यंत महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भरणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आज, बुधवारी महापौर अश्विनी रामाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील असतील. या प्रदर्शन कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयावर व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.’
या प्रदर्शनातील इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते दहावी अशा दोन गटांतील उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर-२०८, सांगली-३३, सिंधुदुर्ग-२० अशा एकूण २६१ शाळा आपल्या उपकरणांची मांडणी करणार आहेत.
प्रदर्शन परिसरास ‘श्री राजर्षी शाहू विज्ञान नगरी’ असे नाव देण्यात आले असून, सभा मंडपास ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ यांचे नाव देण्यात आले आहे.
या विज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी १२.३० वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील असतील. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, डायटचे प्राचार्य डॉ. विलास पाटील प्रमुख उपस्थित असतील.
प्रदर्शनातील कार्यक्रम :
४बुधवारी (दि. २८) दुपारी १२.३० वा. : उद्घाटन
दुपारी २.३० वा. : प्रदर्शन पाहण्यासाठी खुले
सायंकाळी ६ वा. : बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रम
४गुरुवारी (दि. २९) : सकाळी १० वा. : प्रदर्शन पाहणी/ परीक्षण
सायंकाळी ६ वा. : बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रम
४शुक्रवारी (दि. ३०) सकाळी १० वा. : प्रदर्शन पाहणी/ परीक्षण
दुपारी १२.३० वा. : पारितोषिक वितरण व समारोप समारंभ.