रघुवीर यंत्राच्या प्रेरणेतून गगनबावडा जहागिरीत रामनवमी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:04+5:302021-04-21T04:24:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर समर्थ रामदास यांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये रामचंद्रपंत अमात्य यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर समर्थ रामदास यांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये रामचंद्रपंत अमात्य यांना सोन्याचे रघुवीर यंत्र दिले आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन गगनबावडा जहागिरीमध्ये रामनवमी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. आजच्या रामनवमीच्या निमित्ताने या जहागिरीतील सोहळ्याच्या अनेक आठवणी जागवता येतील.
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज पहिले करवीरकर आणि करवीर संस्थानचे छत्रपती संभाजी महाराज या पाच छत्रपतींच्या काळात अमात्यपदी कार्यरत असलेले हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य यांना समर्थ रामदास यांनी सोन्याचे रघुवीर यंत्र दिले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन अमात्य यांनी आपल्या गगनबावडा जहागिरीमध्ये रामनवमी सोहळ्यास सुरूवात केली होती. रामचंद्रपंतांच्या दैनंदिन पूजेमध्ये सुवर्ण रघुवीर यंत्र आणि सुवर्ण रामपंचायतन ही असायचे. ज्यामध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, भरत आणि हनुमान यांच्या सोन्याचे कोरीव काम असणाऱ्या ९ मूर्तींचा समावेश आहे. अमात्यांनी रामनवमीचा हा उत्सव केवळ आपल्या वाड्यापुरता न ठेवता जहागिरीतील सर्वांनाच त्यामध्ये सामील करून घेतले.
या उत्सवासाठी वैयक्तिक निमंत्रणे ही पाठवली जात असत. तळकोकणातील नागरिकांबरोबरच करवीर संस्थानातील सरदार, मानकरी यांच्यासोबत छत्रपती देखील या उत्सवाला उपस्थित लावत असत. मुजुमदार घराण्यापैकी बळवंतरावजी मुजुमदार यांना माधवराव मोरेश्वर अमात्य हुकुमतपनाह संस्थान बावडा यांनी मोडीमध्ये पाठवलेल्या ४ एप्रिल १९०५ रोजीचे हस्त लिखित पत्र आजही उपलब्ध आहे.
या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केली जाणारी संगीत मैफल सजवण्यासाठी देशभरातील अनेक गायक गगनबावड्याला येत असत. अमात्यांच्या गगनबावडा येथील ऐतिहासिक वाड्यातील देवघरासमोर ही मैफल भरत असे. रहिमतखान, करवीर संस्थानचे दरबारातील गायक गायनमहर्षी अल्लादियॉखान, लक्ष्मीबाई, बशीरखान, भास्करबुवा, गोविंदराव टेंबे, इस्माईल सतारिया अशा अनेक मान्यवरांचा यामध्ये समावेश असे.
यानिमित्ताने होणाऱ्या पालखी सोहळ्या वेळी भालदार, चोपदार, रोषणनाईक, घोडे, वाजंत्री, भजनी मंडळ यांचा लवाजमा असायचा. सोहळ्यानंतर भोजन प्रसादही होत असे.
कोट
समर्थ रामदासांनी दिलेले सुवर्ण रघुवीर यंत्र आणि रामपंचायतनच्या मूर्ती आम्ही जतन केल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेवरूनच सज्जनगडावरील रामदास स्वामींच्या समाधीचे बांधकाम रामचंद्रपंत अमात्य यांनी केले होते. रामदास स्वामी यांच्या या सुवर्ण रघुवीर यंत्राच्या प्रेरणेतूनच गगनबावडा जहागिरीतील रामनवमी उत्सव सुरू झाला होता.
निलराजे रामचंद्रराव पंडित
बावडेकर पंत अमात्य
२१०४२०२१ कोल रामनवमी गगनबावडा ०१
गगनबावडा येथे संस्थान काळामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाई. या वेळच्या पालखी सोहळ्यामध्ये नगारखाना, भालदार,चोपदान, आब्दागिरी, भजनी मंडळ असा लवाजमा असे.
२१०४२०२१ कोल रामनवमी गगनबावडा ०२
रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अमात्यांच्या वाड्यामध्ये गायनाच्या मैफलीचे आयोजन करण्यात येत असे.