टाकाऊ प्लायवूडचे अप्रतिम कोलाज
By Admin | Published: December 29, 2014 11:29 PM2014-12-29T23:29:22+5:302014-12-29T23:44:42+5:30
जयंत हुबळी यांच्या कलाकृती : जहागीर आर्टनंतर थेट कोल्हापुरात प्रदर्शन
कोल्हापूर : लाकडापासून विविध कलाकृती किंवा वस्तू बनवणे हा हस्तकलेचाच एक प्रकार; पण टाकाऊ प्लायवूडपासून सुंदर चित्र बनवण्याची अनोखी कला म्हैसूरचे जयंत हुबळी यांनी साधली आहे. वेस्ट वुड विनिअर आर्टचे प्रणेते असलेल्या हुबळी यांनी एखाद्या कॅन्व्हासवर किंवा प्लायवूडवर चित्रे रेखाटल्याप्रमाणे वाटावीत, अशा सफाईदारपणे घडवलेल्या या अप्रतिम चित्रकृतींचे प्रदर्शन गुरुवार
(दि. १)पासून आयोजित करण्यात आले आहे.
शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या कलेबद्दलची माहिती दिली. यावेळी युनिव्हर्सल सर्व्हिसेसचे आनंद कुलकर्णी उपस्थित होते. ते म्हणाले, शाहू स्मारक भवनच्या कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता ज्येष्ठ चित्रकार जे. बी. सुतार यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रात मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीनंतर कोल्हापुरात हे प्रदर्शन होत आहे.
बेळगावमध्ये जन्मलेल्या आणि आता म्हैसूरमध्ये स्थायिक असलेल्या जयंत हुबळी यांनी गेल्या २० वर्षांत एक हजार चित्रकृती निर्माण केल्या आहेत. त्यापैकी ८०० चित्रकृतींची विक्री झाली आहे. या अनोख्या कलाकारीबद्दल त्यांना कर्नाटक राज्य शासनाचा कर्नाटक ललित कला अकादमी पुरस्कार, तसेच म्हैसूर दसरा अवॉर्ड २०१४, अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कोल्हापुरात होत असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी घडवलेल्या ३० चित्रकृती मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन ७ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत खुले राहील. तरी रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेस्ट वुड विनिअर आर्ट
अनेकजण कलेच्या अभिव्यक्तीसाठी कोळसा, पेन्सिल, ब्रश अशी साधने वापरतात. जयंत हुबळी यांनी उपयोगात येऊ न शकणाऱ्या प्लायवूडमधील नैसर्गिक सौंदर्य शोधून ते अधिक खुलविण्यासाठी ‘वेस्ट वुड विनिअर आर्ट’ ही शैली आत्मसात केली. प्लायवूड आणि लाकडापासून ही चित्रे निर्माण करताना त्याला रंगविणे, पॉलिश करणे किंवा टचअप करणे, अशा कृत्रिम साधनांचा वापर केलेला नाही.