Kolhapur: 'अंबाबाईच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 03:33 PM2024-06-29T15:33:06+5:302024-06-29T15:34:12+5:30
रासायनिक संवर्धन प्रक्रियासुद्धा मूर्तीची झीज रोखू शकलेली नाही
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती दुखावली असून रासायनिक संवर्धन प्रक्रियासुद्धा मूर्तीची झीज रोखू शकलेली नाही. तरी देवीची सध्याची मूर्ती बदलून त्या जागी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.
अध्यक्ष सुभाष जाधव, उदय पाटील, सरदार जाधव, प्रशांत खाडे यांच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन दिले. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तपीठापैकी एक पीठ असलेल्या अंबाबाईच्या मूर्तीवर अनेकदा रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाली असून त्यामुळे मूर्तीची अधिकच झीज झाली आहे. याबाबत वारंवार चर्चा, अहवाल, निवेदने देऊनही शासनाने मूर्ती बदलण्याचा विचार केलेला नाही. हिंदू धर्म शास्त्रानुसार दुखावलेल्या मूर्तीची पूजा करणे अशुभ मानले जाते.
तरी सध्याच्या मूर्तीचे विधीपूर्वक विसर्जन करावे व त्याठिकाणी देवीची नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी दयानंद घबाडे, चेतन पवळ, तानाजी जाधव, परशराम रेडेकर, अनिल जाधव, विजय पाटील, राजू पायमल, श्रीकांत कारंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.