कुरुंदवाडला ५८ पीर पंजांची प्रतिष्ठापना
By Admin | Published: November 2, 2014 09:52 PM2014-11-02T21:52:18+5:302014-11-02T23:29:42+5:30
सांगरुळात पंजे प्रतिष्ठापना
कुरुंदवाड : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण कुरुंदवाड व परिसरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जात आहे. शहरामध्ये एकूण १८ ठिकाणी, तर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये ४० अशा एकूण ५८ पीर पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आकर्षक कमान आणि विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघत आहे.
शहरामध्ये झारी पीर, बारगीर पीर, गोधडे पीर, भैरववाडी पीर, मुजावर पीर, बागवान पीर, मोमीन पीर, कारखाना पीर, कुडेखान पीर, वड्डेपीर, ढेपणपूर पीर, खाटीक पीर, शेळके पीर, ढाल कारखाना पीर, बडे नालसाब पीर, ढाल पीर अशा १८ पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील कवठेगुलंद, बस्तवाड, नवेदानवाड, जुने दानवाड, टाकळी येथे प्रत्येकी एक पंजाची, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, गणेशवाडी, अकिवाट, राजापूर येथे दोन पीर पंजांची, घोसरवाड, खिद्रापूर येथे चार, तर शिरढोण, हेरवाड, अब्दुललाट येथे प्रत्येकी पाच पीर पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे.
दरम्यान, मोहरम शांततेत पार पडावा यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी पोलीस ठाण्यांतर्गत गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांच्या प्रमुख लोकांची शांतता बैठक घेऊन मोहरम शांततेने पार पाडण्याचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)
सांगरुळात पंजे प्रतिष्ठापना
सांगरुळ : सांगरुळ येथे मोहरमनिमित्त विविध ठिकाणी पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमसाठी विविध धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने होत आहेत.
पोलीस पाटील बाजीराव खाडे यांच्या हस्ते खाईत कुदळ मारून मोहरमची सुरुवात केली. यावेळी माजी सरपंच आनंदा नाळे, माजी पोलीस पाटील तानाजी नाळे, सुशांत नाळे, सांगरुळ मशिदीचे ट्रस्टी सिराज मुल्ला, महंमद मुल्ला, एस. वाय. मुल्ला, नजीर मुल्ला, फैजुल्ला मुल्ला, सायबीद मुल्ला उपस्थित होते.
सोमवारी खत्तल रात्र होणार असून त्यादिवशी सैली, अटी, हार, अत्तर, गंध लावणे असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री सर्व पंजे मशालसहीत साहब पीर दर्गा भेटीस जाणार आहेत.
मोहरमनिमित्त सांगरुळ मशिदीमध्ये चॉँदसाब स्वारी, नाल्या हैदर, मौला अली, सरकारी पंजा, हुसेन पंजा यांची प्रतिष्ठापना केली आहे. मध्यभागी फातिमा पंजासह सात पंजांची स्थापना व एक निशाण आहे. मंगळवारी सवाद्य मिरवणुकीने पंजे विसर्जनासाठी जाणार आहेत.