एकाच गणेशमूर्तीची २२ वर्षांपासून प्रतिष्ठापना, राजू राऊत यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 03:21 PM2019-09-04T15:21:37+5:302019-09-04T15:23:01+5:30

पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून ३२ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील रंकाळा तलाव प्रदूषित न करण्याची चळवळ सुरू करणारे शाहीर राजू राऊत हे आपल्या घरी गेल्या २२ वर्षांपासून एकाच छोट्या गणेशाची प्रतिष्ठापना करत आले आहेत. कलाकाराच्या घरातून गणेशाचे विसर्जन करणे मान्य न झाल्याने गणेशोत्सवात नवे लेखन आणि काव्याची निर्मिती करणे हीच पूजा ते मानतात.

Installation of single Ganesh idol for 3 years | एकाच गणेशमूर्तीची २२ वर्षांपासून प्रतिष्ठापना, राजू राऊत यांचा उपक्रम

एकाच गणेशमूर्तीची २२ वर्षांपासून प्रतिष्ठापना, राजू राऊत यांचा उपक्रम

Next
ठळक मुद्देएकाच गणेशमूर्तीची २२ वर्षांपासून प्रतिष्ठापनारंकाळा प्रदूषित न करण्याचा संकल्प

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून ३२ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील रंकाळा तलाव प्रदूषित न करण्याची चळवळ सुरू करणारे शाहीर राजू राऊत हे आपल्या घरी गेल्या २२ वर्षांपासून एकाच छोट्या गणेशाची प्रतिष्ठापना करत आले आहेत. कलाकाराच्या घरातून गणेशाचे विसर्जन करणे मान्य न झाल्याने गणेशोत्सवात नवे लेखन आणि काव्याची निर्मिती करणे हीच पूजा ते मानतात.

समविचारी मित्रांसोबत त्यांनी ३२ वर्षांपूर्वी ‘रंकाळा बचाओ’ चळवळ सुरू केली. ही चळवळ उभारताना जलसाठा प्रदूषित होण्यामागील अनेक कारणांपैकी गणेशमूर्तींचे विसर्जन हा एक मोठा घटक असल्याचे लक्षात आल्यानंतर रंकाळा तलावाशेजारीच असलेल्या आणि केवळ सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात, त्या इराणी खणीत राऊत यांनी घरच्या मूर्तीचे विसर्जन सुरू केले. एकट्याच्या गणपतीने काय फरक पडणार, अशी कुचेष्टा करणारी मंडळीही आज मूर्तीदान चळवळीला प्रतिसाद देत आहेत, हा सकारात्मक बदल घडल्याचे राऊत म्हणतात.

चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर, अभिनय, नाटक, लेखन, शाहिरी, काव्य यांसारख्या नानाविध कलाक्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या राऊत यांनी बदलाची सुरुवात घरापासून या विचारांतून बुद्धीदाता गणेशाचे घरातून विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आणि २२ वर्षांपूर्वी छोट्या फायबरच्या गणेशाची प्रतिष्ठापना केली.

गणेशोत्सवात या मूर्तीची षोडशोपचारे यथासांग पूजा, आरती केली जाते. त्यानंतर उत्तरपूजा करून हा गणपती पुन्हा शोकेसमध्ये ठेवला जातो. याला त्यांच्या पत्नी आणि कन्याही साथ देतात.


गणेशाचा आशीर्वाद असल्यामुळेच इतके कलाप्रकार मला अवगत आहेत. कलाकार असल्यामुळे त्याचे विसर्जन न करता गणेशोत्सवात मूर्तीसमोर एखादे नवे लेखन आणि काव्यनिर्मिती करतो, ही पूजा मी मानतो. आजकाल उत्सवातील भाव बाजूला पडून आवाज, नाचगाणे यांसारखे हिडीस आणि बीभत्स प्रकार वाढू लागले आहेत. त्याऐवजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हायला पाहिजे.
राजू राऊत
शिवशाहीर, कलावंत, कोल्हापूर

Web Title: Installation of single Ganesh idol for 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.