कुटुंब नियोजनाऐवजी मुत्राशय पिशवी काढली
By admin | Published: July 27, 2016 01:01 AM2016-07-27T01:01:58+5:302016-07-27T01:04:01+5:30
सेनापती कापशीतील प्रकार : आरोग्य अधिकाऱ्यांचा गलथानपणा
सेनापती कापशी : सेनापती कापशी (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेकरिता दाखल झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया न करता थेट मुत्राशयाची पिशवीच कट केली. यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सेनापती कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोमवारी (दि. २५) व मंगळवारी (दि. २६) कुटुंब नियोजनाचा कॅम्प आयोजित केला होता. यामध्ये चिमगाव (ता. कागल) येथील राजश्री अभिजित करडे या कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी सोमवारी दाखल झाल्या. मंगळवारी (दि. २६) सकाळी आरोग्य अधिकारी डॉ. बी. पी. सातपुते यांनी राजश्री यांना शस्त्रक्रियेकरिता आॅपरेशन थिएटरमध्ये घेतले. त्यावेळी डॉ. सातपुते यांनी कुटुंब नियोजनाचे आॅपरेशन न करता मुत्राशयाची पिशवीच कट केली. त्यानंतर त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना बोलावून आॅपरेशनमध्ये अडचणी आल्या असून, रुग्णाला ताबडतोब कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. नातेवाइकांनी १०८ रुग्णवाहिकेतून सी.पी.आर.मध्ये राजश्री यांना दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी वरील संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईक हादरलेच. रुग्णाला जास्तच त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राजश्री कुरडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात डॉ. सातपुते यांच्याविरोधात आॅपरेशन दरम्यान डॉ. सातपुते यांनी कानात म्युझिक कॉड लावून गाणी ऐकत शस्त्रक्रिया करीत असताना माझ्या मुत्राशयास मोठी दुखापत केली असल्याची तक्रार दाखल केली आहे.
डॉक्टरांची उद्धट वर्तणूक
राजश्री करडे यांचे बंधू सचिन चेचर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, डॉ. सातपुते हे आॅपरेशन दरम्यान गाणी लावून आॅपरेशन करीत होते. तसेच सातपुते यांनी आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. सी.पी.आर.मधील डॉक्टरनी आम्हाला माहिती दिल्यामुळे आम्ही योग्य उपचार करू शकलो. डॉ. सातपुतेंची उद्धट वर्तणूक असून, त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे, तसेच बुधवारी आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आॅपरेशनमध्ये असे होऊ शकते : डॉ. सातपुते
आॅपरेशन दरम्यान असे होऊ शकते. मूत्राशयाची पिशवी ओपन झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी ताबडतोब प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेतून सी.पी.आर.मध्ये दाखल केले. प्रत्यक्ष रुग्णांची भेटही घेतली आहे.