एकमेकांचे खड्डे काढण्याऐवजी लोकांसाठी चांगले काम करा : कृषी आयुक्तांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:26 PM2019-05-07T13:26:26+5:302019-05-07T13:31:52+5:30
चांगली शेती कशी करावी, हे सांगण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे; परंतु हे करण्याऐवजी आपण एकमेकांसाठीच खड्डे काढत बसतो आणि त्यात पडतो; त्यामुळे चांगले काम करा, लोकांशी नीट वागा, ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असा कानमंत्र राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
कोल्हापूर : चांगली शेती कशी करावी, हे सांगण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे; परंतु हे करण्याऐवजी आपण एकमेकांसाठीच खड्डे काढत बसतो आणि त्यात पडतो; त्यामुळे चांगले काम करा, लोकांशी नीट वागा, ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असा कानमंत्र राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित खरीप हंगाम-२०१९-२०च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती कृषी विभागीय सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आदींची होती.
ज्या ठिकाणी जे पिकते त्यावरच अधिकाऱ्यांनी जास्त काम करावे. गडहिंग्लज आणि चंदगडसारख्या तालुक्यांत काजू उत्पादन चांगले आहे. या ठिकाणी इतर व्यवसाय घेण्याऐवजी काजूलाच प्राधान्य दिले पाहिजे; त्यासाठी भविष्यात ‘मिशन काजू’ म्हणूनच काम केले पाहिजे.
काजूमुळे तेथील शेती, शेतकऱ्यांनाही चांगले दिवस येतील. याशिवाय, रोजगाराच्या चांगल्या संधीही उपलब्ध होतील. शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांत बांबू शेतीला पाठबळ दिले पाहिजे. बांबूंसारखे पीक चांगले येऊ शकते. बाहेरील राज्यात एखादा प्रयोग केला असेल, तर तो आपणही अनुकरण करण्यास हरकत नाही. जे पीक ज्या तालुक्यात चांगले येते, तेच पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करा.
अधिकारी केवळ पदासाठी होऊ नका, तर गावागावांत आणि शेतापर्यंत आपले ज्ञान द्या, तसेच शेतीमध्ये अनेक प्रयोग करता येतात, त्याला नवतंत्रज्ञानाची जोड द्यावी. कायद्यावर बोट ठेवून एखादी लोकोपयोगी योजना परत पाठवू नका, तर कशा पद्धतीने ती योजना अंमलात आणता येईल, या दृष्टीने प्रयत्न करा, असा सल्ला देत आपण कृषीमधून शिक्षण घेऊन अधिकारी होऊनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात नसेल, तर त्याचा काय उपयोग? अशी विचारणाही त्यांनी केली.
भीम बांबूचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करा
तमिळनाडूमध्ये ‘भीम’ बांबूचे पीक घेतले जाते. हे पीक चांगले आणि दर्जेदार असल्याने शेतकऱ्यांना याचा भरघोस फायदा होत आहे; त्यामुळे अधिकाऱ्यांनी हे बांबू पीक आपल्या जिह्यात आणून शेतकऱ्यांना दाखविले व तंत्रशुद्ध मार्गदर्शन केल्यास येथील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. नाहीतर वरून उद्दिष्ट आले म्हणून ओढून ताणून ते करायचे हे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे दिवसे यांनी सांगितले.
चुकीच्या पद्धतीने काम करू नका
शासनाच्या उद्दिष्टाप्रमाणे निधी संपवायचा आहे, म्हणून चुकीच्या पद्धतीने काम केल्यास कोणाचाही फायदा होणार नाही. शासनाचा निधी योग्य कामासाठी वापरला गेल्यास नक्कीच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो; त्यासाठी अधिकाऱ्यांनी आळस झटकून काम केले पाहिजे, असे सांगून आपल्या मुला-बाळांनाही आपले काम चांगले वाटले पाहिजे, अशा पद्धतीने नीट काम करा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ३३७ गावांत ‘शेती शाळा’ प्रकल्प
कृषी विभागातर्फे यावर्षी जिल्ह्यातील ३३७ गावांत ‘शेती शाळा’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याचे काम कृषी साहाय्यक पाहणार आहेत. प्रत्येक गावात शेतामध्ये प्लॉट पाडून विविध प्रकारच्या सहा पिकांची लागवड केली जाणार आहे. असे कृषी आयुक्त दिवसे यांनी सांगितले.