‘अटल महापणन’ अभियानातून संस्था रोजगार निर्मितीची केंद्रे : अनिरुद्ध अष्टपुत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:41 AM2019-08-31T11:41:54+5:302019-08-31T11:45:46+5:30
अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून विकास सेवा संस्था सक्षम होण्याबरोबरच रोजगार निर्मितीचे केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी काढले.
कोल्हापूर : अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून विकास सेवा संस्था सक्षम होण्याबरोबरच रोजगार निर्मितीचे केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी काढले.
अटल महापणन विकास अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय लोकसंवाद मोहिमेचा प्रारंभ अष्टपुत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अष्टपुत्रे म्हणाले, ‘जिल्ह्यातील २२४ विकास संस्था व सहा खरेदी-विक्री संघ या अभियानात सहभागी झाले आहेत.
या संस्थांनी १४ कोटी ६९ लाखांची गुंतवणूक विविध व्यवसायांत केली आणि त्यामध्ये एक कोटी सहा लाखांचे उत्पन्न मिळाले. त्याचबरोबर १३५ जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यश आले आहे; त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी विकास संस्थांच्या माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिरोळचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी स्वागत केले. सहायक निबंधक टी. बी. बल्लाळ, संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील, चिखली विकास संस्थेचे सचिव विकास पाटील यांनी अभियानाबाबत माहिती दिली. सहायक निबंधक अमित गराडे यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील विकास संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दृष्टिक्षेपात अभियानातील कोल्हापूरचा सहभाग-
- विकास संस्था-२२४
- खरेदी-विक्री संघ-६
- गुंतवणूक-१४.६९ कोटी
- उत्पन्न- १.०६ कोटी
- निव्वळ नफा-५८ लाख
- रोजगार उपलब्ध-१३५ व्यक्ती