‘जयप्रभा'साठी निकराने लढू, चित्रपट महामंडळाच्या बैठकीत सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:49 PM2019-05-07T13:49:09+5:302019-05-07T13:50:35+5:30
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ ही केवळ कोल्हापूरच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची वास्तू आहे. याबाबत न्यायालयाने निकाल दिला असला ...
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ ही केवळ कोल्हापूरच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची वास्तू आहे. याबाबत न्यायालयाने निकाल दिला असला तरी येथे इमारती नव्हे, तर स्टुडिओचे जतन व्हावे. तेथे चित्रपट निर्मिती होणे गरजेचे आहे. यासाठी निकराने लढू , तसेच लता मंगेशकर यांच्याशी संवाद साधून समन्वयाने प्रश्न सोडविता येईल याचा विचार व्हावा, अशी सूचना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बैठकीत सभासदांनी मांडली.
मागील आठवड्यात दिवाणी न्यायालयाने ‘जयप्रभा’वर लता मंगेशकर यांची खासगी मालकी असून, तेथे त्यांना बांधकामसह अन्य विकास करण्याची मुभा आहे, असा निकाल दिला होता. या निकालानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मिलिंद अष्टेकर म्हणाले, या प्रश्नात केवळ महामंडळ नव्हे तर शासनानेही लक्ष घालून स्टुडिओ ताब्यात घेतला पाहिजे. यासाठी जनरेटा तयार व्हावा म्हणून महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे. अर्जुन नलवडे म्हणाले, लता मंगेशकर यांनी स्टुडिओची जागा सोडावी, पण तेवढीच जागा त्यांना शासनाने अन्यत्र द्यावी, असे निवेदन आयुक्तांना द्यावे. बाबा पार्टे म्हणाले, न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यावर दोन्ही बाजूचे वकील, शहरातील प्रतिष्ठित मंडळी, महापालिका पदाधिकारी, महामंडळाचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊ. लतादीदींच्या मनामध्ये कोल्हापूरबद्दल अजूनही चांगलीच भावना आहे. त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करू. सर्वांना बरोबर घेऊन समन्वयानेच यावर तोडगा काढू. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीचीही मदत घता येईल. यावेळी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहखजानीस शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, श्रीकांत डिग्रजकर, सुरेंद्र पन्हाळकर, मंगेश मंगेशकर, राहुल राजशेखर, अरुण चोपदार, श्रीकृष्ण जोशी, रवींद्र बोरगावकर, सिद्धेश मंगेशकर उपस्थित होते.
----------------------------------