कर्मचारी, अधिकारी यांनाही कोरोनाच्या काळात काळजी घेण्याच्या केल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:07 PM2020-04-27T14:07:57+5:302020-04-27T14:09:44+5:30
कर्तव्यावर असताना काही अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कर्तव्यावर असलेले विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत; त्यांचे संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शासकीय परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
‘लॉकडाऊन’च्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपत्कालीन सेवा म्हणून विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. महसूल, आरोग्य, पोलीस, वीज वितरण, पुरवठा विभाग, आदी विभागांतील अधिकारी व कर्मचा-यांचा यामध्ये समावेश आहे. कर्तव्यावर असताना काही अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी संबंधित विभागाच्या कार्यालयाच्या प्रमुखांनी करावी. या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी नोडल अधिका-यांची नेमणूक करावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शक सूचना अशा : कर्तव्यावर जाताना गणवेशाबरोबरच मास्क, हातमोजे व आवश्यकतेनुसार अॅप्रन परिधान करावे. कार्यालयात साबण, पाणी व हॅँड सॅनिटायझर ठेवावे, दैनंदिन काम सुरू करण्यापूर्वी साबणाने हात धुवावेत व त्यानंतर हातमोजे घालावेत. हातमोजे घातल्यावर चेहरा, डोळे, नाक, तोंड यांना स्पर्श करू नये व हातमोजे खिशात ठेवू नयेत. कार्यालयात काम करीत असताना दोन व्यक्तींंमधील अंतर कमीत कमी एक मीटर ठेवावे. कार्यालयातून घरी गेल्यावर अंघोळ करावी.