अपुरी, चुकीची माहिती हेच ई-पास नाकारण्याचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:21 PM2020-08-12T12:21:04+5:302020-08-12T12:23:49+5:30
परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.
कोल्हापूर : परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.
कोल्हापूरच्याजिल्हाधिकारी कार्यालयातून फक्त बाहेरगावी जाण्यासाठी पास दिले जातात. पुणे किंवा अन्य कोणत्याही शहरातून कोल्हापुरात यायचे असेल तर ते पास संबंधित जिल्ह्याकडून दिले जातात; परंतु तरीही लोक येथे येऊन तक्रारी करतात.
मेपासून नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हापासून महसूलचे १० हून अधिक कर्मचारी केवळ ई-पास देत आहेत. मंजूर पासच्या तुलनेत पास नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशासनाबद्दल नाराजी आहे. त्याबाबत सोमवारी (दि. १०) रात्री ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनीही सोशल मीडियावर तक्रार केली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गवस यांच्या जावयाचा पास तातडीने मंजूर करून दिला.
कोल्हापुरातून बाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून हे ई-पास मंजूर केले जातात. शिवाय ते केवळ एका दिवसासाठीचेच असतात. म्हणजे व्यक्ती बाहेरगावी गेली की पुढील २४ तासांतच त्यांनी परत कोल्हापुरात येणे अपेक्षित असते. मात्र अनेकजण तीन-चार दिवसांच्या मुदतीचे अर्ज करतात, काहीजणांनी आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित केलेली नसते.
अनेकजण योग्य कारण देत नाहीत. त्यांचे कारण आणि मंजुरीच्या तारखेत ताळमेळ नसतो. खूप वेळा तर अर्ज मंजूर झालेला असतो; पण त्यांनी लिंकवर जाऊन ते बघितलेलेच नसते. बऱ्याचदा काहीतरी कारण द्यायचे आणि तुम्ही पास मंजूरच का करत नाही म्हणून भांडत यायचे अशा प्रकारांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते.
नाकारण्याची कारणे
- इतर जिल्ह्यातून कोल्हापुरात येण्याचा अर्ज
- परतीचा कालावधी २४ तासांहून अधिक
- आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र न जोडणे
- कारण नीट न लिहिणे, अथवा अपुरी व चुकीची माहिती
सध्या विभागाकडे गेल्या दोन दिवसांचेच अर्ज प्रलंबित आहेत. तातडीचे आणि अत्यावश्यक कारण असेल तर नागरिकांनी परगावी जावे. त्यासाठीचे अर्जही व्यवस्थित व प्रशासनाच्या नियमानुसार भरावेत.
-रंजना बिचकर
ई-पास मंजूर कक्ष अधिकारी