विमा कंपनीला झटका
By admin | Published: December 2, 2015 12:35 AM2015-12-02T00:35:34+5:302015-12-02T00:36:28+5:30
अपघात विमा घेण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी आपआपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज केला.
गोंदिया : अपघात विमा घेण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी आपआपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज केला. परंतु कृषी अधिकारी कार्यालयाने दिरंगाई करुन अर्जदारांना नाहक त्रास देण्याचा प्रकार केला. या संदर्भात विमा कंपनी व तालुका कृषी अधिकारी यांच्याविरोधात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राने व्याजासह अर्जदारांना विम्याचे पैसे देण्याचे आदेश शुक्रवार (२७) रोजी देण्यात आले.
आमगाव तालुक्याच्या कुणबीटोला येथील शेतकरी सुखराम दशरथ भांडारकर यांच्या मालकीची सर्वे नंबर ३९६/१ चिरचाळबांध येथे त्यांची जमीन आहे.
रेल्वेच्या धडकेत १ मे २०१३ रोजी सुखराम भांडारकर यांचा मृत्यु झाला. या संदर्भात त्यांची पत्नी हिरन सुखराम भांडारकर रा. कुणबीटोला यांनी कृषी अपघात विम्याचे १ लाख रुपये मिळावे यासाठी कृषी अधिकाऱ्याकडे १६ डिसेंबर २०१३ रोजी अर्ज केला. परंतु दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने दस्तावेज नसल्याचे कारण दाखवून त्यांचा दावा फेटाळला. यासंदर्भात त्यांनी ४ एप्रिल २०१५ रोजी ग्राहक मंचात तक्रार केली. या प्रस्तावात घटनास्थळ पंचनामा न दिल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू नाही तर आत्महत्या असल्याचे कारण सांगून विमा कंपनीने त्यांचा दावा फेटाळला होता.
दुसरे प्रकरण देवरी तालुक्यातील मुल्ला येथील आहे. मुल्ला येथील फुलनबाई ताराचंद भुते २० सप्टेंबर २०१३ रोजी शेतात काम करीत असताना त्यांना विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावाची शेती सालेकसा तालुक्याच्या धानोली येथे आहे.
यासंदर्भात त्यांचा मुलगा देवेंद्र ताराचंद भुते यांनी ३ डिसेंबर २०१३ रोजी तालुका कृषी अधिकारी देवरी यांच्याकडे अर्ज केला. परंतु विमा कंपनीने त्यांचे प्रस्ताव मंजूर केले नाही. या संदर्भात भुते यांनी २३ मार्च २०१५ रोजी ग्राहक तक्रार निवारण केंद्रात अर्ज केले. वारसानाचे नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे सदर प्रकरण नामंजूर करावे असे विरुद्ध पक्षाच्या वकिलांचे म्हणणे होते. परंतु तक्रारकर्ता एकटाच वारसान असून त्यांच्या बहिणींचे लग्न झाल्यामुळे सध्या वारसान ते एकटेच आहेत हे स्पष्ट झाले. दोन्ही आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
ग्राहक न्यायालयाने असा दिला आदेश
आमगाव तालुक्याच्या कुणबीटोला येथील शेतकरी सुखराम दशरथ भांडारकर यांच्या प्रकरणात ग्राहक न्यायालयाने अपघाती विम्याचे १ लाख रुपये १७ एप्रिल २०१५ पासून दरसाल, दरशेकडा ९ टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच तक्रारकर्तीला मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये, तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये महिन्याभराच्या आत देण्याचे आदेश दिले. तर मुल्ला येथील फुलनबाई ताराचंद भुते यांच्या प्रकरणात १ लाख रूपये व ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. २३ मार्च २०१५ पासून दरसाल, दरशेकडा ९ टक्के व्याजदराने १ लाख रुपयाचा व्याजासह महिन्याभराच्या आत देण्याचे आदेश दिले.