विमा कंपनीच्या बोगस पावत्यांद्वारे गंडा; दोघांना अटक
By admin | Published: February 17, 2015 12:11 AM2015-02-17T00:11:17+5:302015-02-17T00:11:38+5:30
सकृतदर्शनी एक लाख ४२ हजारांची फसवणूक असली, तरी मोठी रक्कम अडकली असण्याची शक्यता
आजरा : रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीची बोगस पावतीबुके छापून आठजणांना एक लाख ४२ हजार रुपयांना गंडविल्याप्रकरणी आजरा पोलिसांनी अंजली रवींद्र पाटील (रा. बिद्री मौनीनगर, ता. कागल) या तरुणीसह सुनील महादेव बिरंबोळे (रा. मडिलगे खुर्द, ता. भुदरगड), धीरज जयसिंग पाटील या तिघांना अटक केली आहे. सकृतदर्शनी एक लाख ४२ हजारांची फसवणूक असली, तरी यामध्ये मोठी रक्कम अडकली असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत.याबाबत पोलीस निरीक्षक सी. बी. भाले यांनी दिलेली माहिती अशी : अंजली पाटील, सुनील बिरंबोळे व धीरज पाटील यांनी आजरा येथील मयूर पेट्रोल पंपानजीक रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय सुरू करून विमा उतरविण्यासाठी ग्राहकांकडून ११ एप्रिल २०१३ ते २७ मे २०१४ या कालावधीत अनेकांकडून पैसे घेतले. सुरुवातीला कंपनीची अधिकृत कागदपत्रे दिली. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या हप्त्याकरिता बोगस पावत्या ग्राहकांना दिल्या.दरम्यान, कार्यालय बंद झाले. पावत्यांवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा ग्राहकांनी प्रयत्न केल्यावर संपर्क होत नसल्याचे लक्षात आले. अखेर कासार-कांडगाव येथील शिवाजी विठोबा गुरव व अन्य ठेवीदारांनी पोलिसांत तक्रार दिली. कंपनीच्या गडहिंग्लज येथील कार्यालयात तक्रारदारांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गेले दोन महिने पोलीस या तिघांच्या शोधात होते. अखेर त्यांना राधानगरी व कोल्हापूर येथे अटक करण्यात यश मिळाले.
पुढील तपास आजरा पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक सी. बी. भालके करीत आहेत.