कोल्हापूर जिल्ह्यातील साडेअकरा लाख बँक ग्राहकांना विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 04:47 PM2020-05-24T16:47:49+5:302020-05-24T16:51:32+5:30
तरी जे ग्राहक या विमा योजनेपासून वंचित आहेत त्यांनी आपल्या बँक शाखेशी, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्राशी किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या विमा योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे ही माने यांनी कळविले आहे.
कोल्हापूर -- जिल्ह्यातील ११ लाख ७२ हजार बँक ग्राहकांनी सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा योजनेंत सहभाग नोंदविला आहे, या विमा योजनांच्या नूतनीकरणास येत्या २५ मेपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने यांनी शनिवारी येथे दिली.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा नूतनीकरण मोहीम जिल्ह्यात उद्या, सोमवार ते १ जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत ७ लाख ८० हजार बँक ग्राहकांनी तर जीवन विमा योजनेंतर्गत ३ लाख ९२ हजार बँक ग्राहकांनी सहभाग नोंदविला असून यापुढील काळातही जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी त्यांचे बँक खाते असणाऱ्या बँकेत या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राहुल माने यांनी केले आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू व अपंगत्व यासाठी २ लाखांपर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता केवळ बारा रुपये आहे. तर जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाखांपर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता ३३० रुपये आहे. तरी जे ग्राहक या विमा योजनेपासून वंचित आहेत त्यांनी आपल्या बँक शाखेशी, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्राशी किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या विमा योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे ही माने यांनी कळविले आहे.