पतसंस्थांच्या ठेवींसाठीही विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:55 AM2017-07-23T00:55:21+5:302017-07-23T00:55:21+5:30

सुभाष देशमुख : सांगलीतील पतसंस्थांच्या सहकार परिषदेत आश्वासन

Insurance protection for credit institutions deposits | पतसंस्थांच्या ठेवींसाठीही विमा संरक्षण

पतसंस्थांच्या ठेवींसाठीही विमा संरक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --सांगली : बॅँकांप्रमाणे आता पतसंस्थांच्या ठेवींनाही विमा संरक्षण देण्यात येईल. त्यासाठी विम्याचा हप्ता निश्चित करून लवकरच या गोष्टीची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगलीतील सहकार परिषदेत दिले.
डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात जिल्ह्यातील पतसंस्थाचालकांची सहकार परिषद पार पडली. यावेळी देशमुख म्हणाले की, पतसंस्थांमध्ये गोरगरीब व सामान्य जनतेचा पैसा येत असतो. एखादी पतसंस्था अडचणीत आली की त्याचा फटका अन्य पतसंस्थांनाही बसत असतो. त्यामुळे पतसंस्थांना संरक्षण देण्याबरोबरच त्यामधील ठेवींनाही संरक्षण मिळावे, अशी माझी भूमिका आहे. विम्याचा हप्ता निश्चित करून विमा संरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल. पतसंस्थांनीही नफ्यातून काही रक्कम बाजूला करून ती शासनाकडे जमा करावी. त्याच पैशातून एखादी संस्था किरकोळ रकमेमुळे अडचणीत आली असेल तर, तिला या निधीतून मदत करता येईल.
ते म्हणाले की, कायद्यामधील बदल व नवे नियम याचा बाऊ न करता येणारे नियम, कायदे आपल्या फायद्यासाठीच आहेत, असे समजावे. बँकांना जे नियम लागू आहेत, ते नियम पतसंस्थांनी स्वत:हून लावून घ्यावेत. त्यामुळे पतसंस्थांमधील आर्थिक शिस्त बिघडणार नाही. समाजासाठी आपण पतसंसथा चालवित आहोत, याचे भान संस्थाचालकांनी ठेवले पाहिजे. मित्र, नातेवाईक यांच्यासाठी पतसंस्थेचा गैरवापर करू नये. लेखापरीक्षकांनीही लेखापरीक्षण करताना सजग रहावे. अनावधानाने चुका झाल्या असतील तर, त्या संस्थेला मदत करावी आणि जाणीवपूर्वक चुका झाल्या असतील तर, त्यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस त्यांनी करावी.
यावेळी महाराट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर म्हणाले की, कोणताही कायदा आला तर त्याचा आदर करायला पतसंस्थांनी शिकले पाहिजे. पतसंस्था अडचणीत आल्या तर, संस्थाचालकांना अटक केली जाते. त्याचपद्धतीने पतसंस्था फायद्यात आली तर, त्या नफ्यातील काही भाग संचालकांना मिळावा, अशा विचाराशी सहकारमंत्री सहमत आहेत. त्यामुळे निश्चितपणे चांगल्या संस्थांना ते मदत करतील. रामायणात हनुमानाला त्याच्या ताकदीची जाणीव करून देणाऱ्या जांबुवंताप्रमाणे वीराचार्य पतसंस्थेने भूमिका निभावली आहे.
यावेळी आ. सुधीर गाडगीळ, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ काका कोयटे, फेडरेशचे संचालक शशिकांत राजोबा, कुचनुरे पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश सांगावे, उपाध्यक्ष गुणधर टकुुडगे, प्रा. डी. ए. पाटील, सागर चौगुले, डॉ. अजित पाटील, मकरंद देशपांडे उपस्थित होते.


...तर सरचार्ज एक टक्का
देशमुख म्हणाले, पतसंस्थांना वसुलीमागे लावण्यात आलेला सरचार्ज अडचणीचा वाटत आहे. प्रत्यक्षात तो शासकीय अधिकाऱ्याच्या पगारासाठी वसूल केला जातो. शासनाचा अधिकारी जर वसुलीला आला तर, पतसंस्थांनी ६ टक्के सरचार्ज द्यावा, अन्यथा पतसंस्थांमार्फत वसुली झाली तर एक टक्काच सरचार्ज लागू होईल. असा नियम लवकरच करण्यात येईल.
सहकार रॅली
वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त व सहकार परिषदेच्या निमित्ताने दुपारी सहकार रॅली काढण्यात आली.

Web Title: Insurance protection for credit institutions deposits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.