पिकाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्यास विम्याचा परतावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:00+5:302021-08-28T04:29:00+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे अशा ...
कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विम्याचा परतावा देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी शिरोळमधील ५ टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे यंदाच्या खरीप हंगामात शिरोळ तालुक्यातील ७ पैकी ६ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरुंदवाड या गावांचा समावेश आहे. पिकांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार ६ महसूल मंडळ गटात सोयाबीन व भुईमूग या पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याचे आढळले आहे.
ज्या शेतक-यांनी सोयाबीन व भुईमूग पीक विमा हप्ता रक्कम २३ जुलै २०२१ अखेर किंवा त्यापूर्वी भरली आहे किंवा त्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम वजा झाली आहे असेच शेतकरी मदतीसाठी पात्र असणार आहे. अपेक्षित नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्क्यांपर्यंतची रक्कम आगाऊ देण्यात येणार असून ही मदत अंतिम नुकसानभरपाई रक्कमेतून दिली जाईल. कृषि व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय शासननिर्णयानुसार ही नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी ५ क्षेत्रातील शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरुंदवाड येथील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
----
नुकसानीचा तपशील
तालुका : पिक : क्षेत्र, महसूल मंडल गट : सरासरी उत्पादकता कि./ हे., : प्रत्यक्ष उत्पादन : टक्के
शिरोळ : सोयाबीन : शिरोळ, नृसिंहवाडी : २०७२.८ : ० : ०
जयसिंगपूर, नांदणी : १८१८.६ : ५७३.०७ (जयसिंगपूर) : ३१.५१
शिरढोण, दत्तवाड, कुरुंदवाड : १७०३.३ : ० : ०
------------
शिरोळ : भुईमूग : शिरोळ, नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर : १३३०.९ : ३८३.३३ (जयसिंगपूर) : २८.८०
शिरढोण, दत्तवाड, कुरुंदवाड : १२०९ : ० : ०
-----------