एकात्म सूत्रात आॅक्सफर्डमधील कारभार
By admin | Published: February 20, 2017 12:21 AM2017-02-20T00:21:54+5:302017-02-20T00:21:54+5:30
देवानंद शिंदे : व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून परतीनंतर विद्यापीठात विशेष व्याख्यान
कोल्हापूर : आॅक्सफर्ड विद्यापीठात एक देश, एक भाषा, एक संस्कृती आणि एक कायदा अशा एकात्म सूत्रात कारभार चालतो. एकूणच तेथील शिस्त आणि संशोधन-अध्यापन संस्कृती अत्यंत अनुकरणीय आहे, अशी भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिंदे हे युरोपियन युनियनच्या ‘नमस्ते’ प्रकल्पांतर्गत इंग्लंडच्या आॅक्सफर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून एक
महिना संशोधन करून नुकतेच
परतले. त्यांच्या आॅक्सफर्ड येथील अनुभवाचा लाभ शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, संशोधक, विद्यार्र्थी-विद्यार्थिनींचा मिळावा, यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे विशेष व्याख्यान शनिवारी राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू म्हणाले, आॅक्सफर्ड विद्यापीठात संशोधन आणि अध्यापनाची तिथे इतकी अप्रतिम सांगड घातली गेली आहे की, त्यामुळेच या विद्यापीठातून आजपर्यंत ५० हून अधिक नोबेल विजेते आणि जागतिक स्तरावर गौरविले गेलेले शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार निर्माण झाले. येथे जनतेच्या प्राधान्यक्रमावर सर्वप्रथम देश असतो. त्यानंतर संस्था, कुटुंब आणि सरतेशेवटी ‘मी’ असतो. या ‘मी’पणापासून मुक्ती मिळविण्याची शिकवण आॅक्सफर्डने दिल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आॅक्सफर्ड विद्यापीठासह भेटी दिलेली अन्य विद्यापीठे, विविध शहरे, प्रयोगशाळा यांची माहिती दिली.
यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्र्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, संशोधक विद्यार्र्थी-विद्यार्थिर्नी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
सुसज्ज ग्रंथालये
दीड लाख लोकवस्तीच्या आॅक्सफर्ड गावात सुमारे १२५ ग्रंथालये आहेत. येथील मध्यवर्र्ती ग्रंथालयात सुमारे एक कोटी वीस लाख ग्रंथ असून, सन १६२० पासून प्रसिद्ध झालेले प्रत्येक पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे. इतक्या प्रचंड संग्रहातील कोणतेही पुस्तक अवघ्या तीन मिनिटांत वाचकाला उपलब्ध करण्यात येते.