सुपीक जमिनीतून राष्ट्रीय महामार्ग केल्यास तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:52+5:302021-02-12T04:21:52+5:30
शिये : प्रस्तावित रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा शिये ते निगवे दुमाला परिसरातून सध्या अस्तित्वात असलेल्या राज्यमार्ग ...
शिये : प्रस्तावित रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा शिये ते निगवे दुमाला परिसरातून सध्या अस्तित्वात असलेल्या राज्यमार्ग क्रमांक १९४ वरूनच करावा. असे झाल्यास शिये गावची फक्त ३० एकर जमीन बाधित होणार असून ६० एकर जमीन बाधित होण्यापासून वाचणार आहे. मात्र, पर्यायी रस्ता असतानाही सुपीक जमिनीतून राष्ट्रीय महामार्ग केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिये, भुये, भुयेवाडी, निगवे दुमाला या परिसरातून राज्यमार्ग क्रमांक १९४ जात आहे. याच राज्यमार्गाला दोनशे ते चारशे मीटर समांतर असा प्रस्तावित रत्नागिरी - नागपूर महामार्ग जाणार आहे. त्यामुळे नवीन रस्ता तयार करणे गरजेचे नाही. नवीन रस्ता तयार केल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग हा राज्य महामार्गावरून व्हावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर ॲड. माणिक शिंदे, बजरंग मगदूम , भिकाजी फडतारे, देवदास लाडगावकर, माणसिंग पाटील, ज्ञानदेव पाटील, के. बी. खुटाळे, शंकर मगदूम आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
फोटो: ११ शिये शेतकरी संघटना
शिये : निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देताना ॲड. माणिक शिंदे व शेतकरी.