वीज जोडण्या तोडल्यास तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:22 AM2021-02-15T04:22:02+5:302021-02-15T04:22:02+5:30
कसबा तारळे : ग्रामीण जनता कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आली आहे. अशातच व्याजासह घरगुती विजेची बिले ग्रामीण भागातील ग्राहकांनी ...
कसबा तारळे : ग्रामीण जनता कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आली आहे. अशातच व्याजासह घरगुती विजेची बिले ग्रामीण भागातील ग्राहकांनी तातडीने भरावीत, असा तगादा लावत वीज महावितरण कंपनी वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवत आहे. हा प्रकार तातडीने थांबवला नाही, तर महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भोगावती साखर कारखान्याचे संचालक व माजी सरपंच रवींद्र पाटील यांनी दिला. रवींद्र पाटील, सरपंच अशोक कांबळे, ज्ञानदेव पाटील, बंडोपंत वागरे, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष धनाजी पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले. पाटील म्हणाले, मार्च ते ऑक्टोबरदरम्यान कोरोना कालावधीत लॉकडाऊन होता. त्यामुळे उत्पन्नाची साधने बंद होती. या काळातील घरगुती वीजबिलात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. ती सूट न मिळताच घरगुती ग्राहकांसाठी वीज कंपनीने लादलेली विजेची बिले अव्वाच्या सव्वा आहेत. त्यावर भरमसाट व्याज व दंडव्याजही आकारलेले आहे. मीटर रीडिंगप्रमाणे बिले सवलतीसह द्यावीत. यापूर्वी कधीही घरगुती बिले या जनतेने थकवली नाहीत; परंतु कोरोनाच्या संकटामुळे असा प्रसंग ओढवला आहे. त्यातच वीज कनेक्शन तोडणे सुरू झाले आहे. हे प्रकार ताबडतोब थांबवावेतश अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
फोटो : १४ वीज कसबा तारळे
ओळी : कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे वीज महावितरण कंपनीच्या कारवाईविरोधात आंदोलनाचा इशारा देताना रवींद्र पाटील, अशोक कांबळे, ज्ञानदेव पाटील, अनंत तेली, निवास बावडेकर, धनाजी पाटील, राजेंद्र शेलार, बंडोपंत वागरे आदी. ...................