साहित्यिक, वाचक यांचा संवाद साधला जावा

By admin | Published: May 19, 2016 11:41 PM2016-05-19T23:41:28+5:302016-05-20T00:31:12+5:30

नवोदित लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ : मुस्लिम मराठी साहित्य संमेलन उद्यापासून कोल्हापुरात

Interactive, reader should be communicated | साहित्यिक, वाचक यांचा संवाद साधला जावा

साहित्यिक, वाचक यांचा संवाद साधला जावा

Next

संतोष तोडकर -- कोल्हापूर --मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून मुस्लिम बोर्डिंग हाऊसतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, शनिवारपासून दोन दिवसीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने...साहित्य संमेलन हा त्या भाषेतील समाजाचा वाङ्मयीन उत्सवच असतो. त्यामुळे अशा संमेलनाकडून साऱ्यांच्याच अपेक्षा असतात. साहित्य संमेलनांमध्ये पूर्वीचे साहित्य कसे होते, त्याचे आजचे स्वरूप कसे आहे आणि भविष्यात साहित्यसृष्टीत कोणते बदल होऊ शकतात, कसे बदल अपेक्षित आहेत, यावर चर्चा होणे अपेक्षित असते.
साहित्य चळवळीला बळ मिळावे, ती अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने कोणती पावले टाकली जावीत, याची दिशा ठरविण्यासाठी ते उपयुक्त असते. तसेच साहित्यिक-वाचक यांचा एकमेकांशी संवाद व्हावा, अशी अपेक्षा असते.
मराठी भाषेतील शिखर समजले जाणारे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ अनेकदा राजकीय प्रचाराची व्यासपीठे आणि वादावादीचे कें द्र बनल्याचे आपण पाहतो. वाचक अशा संमेलनांपासून दुरावत असल्याचे दिसते. तसेच अशा प्रस्थापित साहित्य संमेलनातून नवोदित मुस्लिम लेखकांना व त्यांच्या ग्रंथसंपदेला नेहमीच दुर्लक्षित केले गेल्याने मुस्लिम मराठी लेखकही अशा व्यासपीठापासून कोसो दूर असल्याचे चित्र दिसते.
मुस्लिम मराठी साहित्यात १५ व्या शतकापासून संतसाहित्याची परंपरा आढळते; परंतु आजवर मुस्लिम साहित्यकांना हक्काचे व्यासपीठ न मिळाल्याने काही अपवाद वगळता त्यांची ग्रंथसंपदा समाजासमोर आलीच नाही. कोणतेही साहित्य हे त्या काळातील समाजाचे प्रतिबिंब असते. वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यांत व कालावधीत समाजाचे चित्रण, सार्वभौम मुस्लिम अस्मिता, जीवनशैली, सर्वसमावेशक इस्लाम संस्कृती, इतिहास या गोष्टी सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे ‘मुस्लिम मराठी साहित्य संमेलन’ भरविणे ही काळाची गरज बनली.
या संमेलनात सुमारे पाचशे लेखक हजेरी लावणार आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या चर्चा, परिसंवाद, वैचारिक घुसळणीतून
नवे विचार समाजाला मिळतील. अनेक समस्यांवर साधक-बाधक
चर्चा होतील. अशा साहित्य
संमेलनात वाचकांना सहभागी
करून घेऊन वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न होतील. नवोदित मुस्लिम मराठी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने मराठी साहित्यविश्वात मोलाची भर पडेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.


मुस्लिम लेखक हे महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. त्यांच्या समस्या, दुखणी वेगळी आहेत. सर्वसामान्य मराठी वाचकांना त्यांचं जग अपरिचित आहे. मुस्लिम साहित्याची नोंद मराठी साहित्यात घेतली जात आहे. रसिकांनाही आता या साहित्याबद्दल कुतूहल वाटत आहे. अशा साहित्य संमेलनामुळे वेगळे आवाज मराठी साहित्याला समृद्ध करतील.
- शफाअत खान,
अध्यक्ष, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

या संमेलनात विविध क्षेत्रांतील विचारवंतांच्या परिसंवाद, चर्चेतून अनेक मौलिक विचार साहित्य चळवळीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील. नव्या लेखकांना व्यासपीठ मिळाल्याने साहित्यनिर्मितीस चालना मिळेल.
- गणी आजरेकर, निमंत्रक, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

Web Title: Interactive, reader should be communicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.