कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये-: शिवसेनेसह पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांनी दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:41 AM2019-08-17T00:41:14+5:302019-08-17T00:43:49+5:30
व्यापारी व्यावसायिकांच्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज ५ आॅगस्टपासून सहा महिन्यांसाठी बॅँकांनी घेऊ नये, असे आदेश त्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन
कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरीतील व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. कर्ज काढून सुुरू केलेला व्यवसायच पाण्यात गेल्याने हप्ते फेडणे व व्याज भरणे शक्य नाही. त्यामुळे व्यापारी व्यावसायिकांच्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज ५ आॅगस्टपासून सहा महिन्यांसाठी बॅँकांनी घेऊ नये, असे आदेश त्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना व व्यापाऱ्यांच्या व्यापक शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली. या पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या व्यापारी, व्यावसायिकांना उभे राहण्यासाठी शासनपातळीवर मदत होणे गरजेची आहे, असे पवार यांनी सांगितले. निवेदनातील प्रमुख मागण्या अशा, सहा महिन्यांनंतर पुढील सहा महिन्यांसाठी व्याज आकारणी करून ती स्वतंत्र लिहून ठेवावी, परंतु व्याजावर व्याज, दंडव्याज आकारले जाऊ नये, मुदती कर्जात कर्जदारांना विनंतीनुसार कर्जमुक्त, कर्जहप्ता यांची फेररचना करून घ्यावी, राष्टÑीय, राज्य आपदा राहत कोष, शासन आदींकडून मिळणारी अंतिम मदत किंवा विमा परतावा जो कर्ज खात्यास परस्पर जमा होईल तो बॅँकेने कर्जास जमा करून घेऊ नये, बॅँकांनी पूरग्रस्त कर्जदारांच्या बाबतीत कर्ज कॅश क्रेडिट स्वरुपाचे असल्यास ५ आॅगस्ट २०१९ रोजी कर्जमर्यादा होती तीच किमान पुढील १२ महिने विना बदल वापरण्याची जागा मिळावी. कर्जदाराने बॅँकेस तारण दिलेल्या मालाची स्थावर, जंगम मालमत्तेची मासिक बाजारभावाने होणारी किंमत यावर त्याची उचलीची मर्यादा ठरते, पुरामुळे तारण नाहीसे झाले असेल किंवा त्याचे बाजारमूल्य घटले असेल, त्यामुळे कर्जदाराची किमान मंजूर मर्यादा वापरण्याची परवानगी त्याला मिळावी.
यावेळी नगरसेवक राहुल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दिलीप शेटे, अमर समर्थ, संजय शेटे, गिरीष साटम, शशिकांत बिडकर, शैलेश पुणेकर, कमलाकर जगदाळे, रणजित आयरेकर, हर्षल सुर्वे, मनजित माने, कपिल डोईफोडे, शिवाजी पाटील, प्रवीण पालव, राजू जाधव, अभिजित बुकशेठ आदी उपस्थित होते.