GokulMilk Election- इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 03:36 PM2021-03-31T15:36:10+5:302021-03-31T15:43:22+5:30
Raju Shetty GokulMilk Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे अशी अट घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे अशी अट घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
गोकुळ दूध संघावर गेली 25 वर्षे एकहाती सत्ता असलेल्या महादेवराव महाडिक यांच्यासमोर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मोठं आव्हान उभं केले आहे. महादेवराव महाडिक यांनी बुधवारी सकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. गोकुळ हा अर्धा ते एक लिटर दूध उत्पादन करणाऱ्या सर्वसामान्य उत्पादकांचा संघ आहे आणि त्यावर कब्जा करण्यासाठी आता अनेक जण पुढे आले आहेत. त्यामुळे गोकुळ वाचवायचं असेल तर तुमची सोबत हवी असे साकडे महाडिकांनी राजू शेट्टींना घातले आहे.
ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे त्यांनी गोकुळमधून किमान 30 टन पशुखाद्य घेतले असले पाहिजे अशी अटही असल्याचं त्यांनी स्पष्ट केले, त्यावर गोकुळ दूध संघ हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे असं वाटत असेल तर इतर अटींप्रमाणे सर्वच इच्छुकांनी न थकता किमान दहा लीटर दूध काढून दाखवावे, अशी अट घालण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. गोकुळच्या निवडणुकीत नेत्यांच्याच मुलांना अधिक अर्ज भरल्याचं दिसत आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.
महादेवराव महाडिक यांनी जरी आज भेट घेतली असली तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय अजून कळवलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन दोन दिवसात आपला निर्णय कळवणार आहेत.
- राजू शेट्टी,
माजी खासदार, नेते , स्वाभिमानी शेतकरी संघटना