शेतीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या इच्छुक
By admin | Published: November 11, 2015 08:47 PM2015-11-11T20:47:11+5:302015-11-11T23:52:27+5:30
आजरा तालुका : स्थानिक प्रजातींचे बियाणे, खतांचे अस्तित्व धोक्यात
ज्योतीप्रसाद सावंत ल्ल आजरा
आजरा तालुक्यात असणारी पाण्याची मुबलकता, कसदार जमीन व सकारात्मक भौगोलिक वातावरण यामुळे तालुक्यात नवनवीन शेतीमधील उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने बाहेरच्या बड्या कंपन्या करार तत्त्वावर जमिनीचे मोठे तुकडे घेण्यास प्रयत्नशील असून, दर्जेदार बियाणे, सेंद्रीय शेतीस प्राधान्य व आवश्यकता भासल्यास दर्जेदार खतांचा वापर केला जाणार असल्याने स्थानिक प्रजाती व त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर होणाऱ्या स्थानिक खतांच्या अस्तित्वाबाबत येत्या काही वर्षांत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
करार पद्धतीने दीर्घ कालावधीकरिता विविध पिकांच्या लागवडीसाठी बाहेरच्या कंपन्या आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमिनी घेण्यास इच्छुक आहेत. त्यादृष्टीने हालचालीही सुरू आहेत. शंभर ते अगदी दहा हजार एकरपर्यंतच्या जमिनींचा शोध आजरा तालुक्यात सुरू आहे. यंत्रांच्या साहाय्याने अत्याधुनिक बियाण्यांचा व प्रगत जैविक, द्रवीय खतांचा वापर करून ही शेती केली जाणार आहे. एका मोठ्या कंपनीने या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बटाटा व हरभरा लागवड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांना या सर्व प्रकारात यश आले तर स्थानिक पारंपरिक वाणांचे स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी शेतकरी वर्गास मोठे कष्ट करावे लागणार आहेत. काही शेतकऱ्यांनी थेट करार करून त्यांच्यामार्फत बी-बियाणे, खते पुरवून शेती करवून घेण्याचे पर्यायही शेतकऱ्यांसमोर पुढे येत आहेत.
संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास करून दर्जाशी तडजोड न करता बाजारात ज्याची मागणी आहे अशीच पिके पिकविण्याकडे यापुढे अशा कंपन्यांचा कल राहणार आहे. प्राधान्याने सेंद्रीय पद्धतीने पीक घेण्यात येणार असल्याने रासायनिक व इतर खत विक्रीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
एकंदर करार तत्त्वावर आंतरराष्ट्रीय कंपन्या आजरा तालुक्यात शेतीवर वर्चस्व निर्माण करण्यास प्रयत्नशील असून, यामुळे स्थानिक शेतीला धोक्याचा इशारा मिळू लागला आहे.
ऊस उत्पादन घटणार?
बागायत पिकांच्या जमिनीवर अशा कंपन्यांचा डोळा असून, विनासायास भक्कम रकमा जमीनमालकांना मिळणार असल्याने ऊस पिकामध्ये घट होणार आहे.