‘यशवंत’च्या विक्री व्यवहारास अंतरिम स्थगिती
By Admin | Published: May 19, 2015 11:49 PM2015-05-19T23:49:01+5:302015-05-20T00:10:26+5:30
ऋण वसुली प्राधिकरणाचे आदेश : दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत निर्बंध
सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारास दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगितीचा आदेश मंगळवारी ऋण वसुली प्राधिकरणाचे न्यायमूर्ती दीपक ठक्कर यांनी दिला. त्यामुळे जिल्हा बॅँक आणि गणपती जिल्हा संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
थकीत कर्जामुळे जिल्हा बँकेने नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखाना लिलावात काढला होता. गणपती संघाने तो लिलावात खरेदी केला होता. मात्र, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने चुकीची लिलाव प्रक्रिया राबविली असून, कारखान्याचा लिलाव बेकायदेशीर असल्याने कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी सभासदांच्यावतीने आ. अनिल बाबर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पुणे येथील ऋण वसुली प्राधिकरणामध्ये वस्तुस्थिती मांडण्यास याचिकाकर्त्यांना सांगितले. त्यासाठी सहा आठवड्यांची देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवली. प्राधिकरणाकडे यासंदर्भात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिकेवरील अंतिम निकाल होईपर्यंत अंतरिम स्थगितीचा आदेश दिला. तोपर्यंत बॅँकेला कोणताही विक्री व्यवहार करता येणार नाही असेही म्हटले आहे. कारखान्याची लिलाव प्रक्रिया जिल्हा बॅँकेने चुकीच्या पद्धतीने राबविली आहे. अशी भूमिका याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती.
गायरान जमिनीचा
मुद्दा अडचणीचा
मौजे नागेवाडी येथील गट नं. ५४१/१ व १२५८/१ ही जमीन गायरान असून, याचे क्षेत्र सुमारे १०३ एकर आहे. ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यावेळी कारखान्यास मिळाली आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय अशी जमीन विकता येणार नसल्याने हा मुद्दा अडचणीचा ठरणार आहे.