आंतरधर्मीय लग्न केलेल्या दाम्पत्याची कोंडी
By admin | Published: March 10, 2017 11:36 PM2017-03-10T23:36:15+5:302017-03-10T23:36:15+5:30
मदतीचे आवाहन : बिलासाठी थांबला डिस्चार्ज
कोल्हापूर : मुलगी लिंगायत वाणी तर मुलगा नवबौद्ध समाजातील. मूळ गाव सांगली जिल्ह्यातील. वर्षभरापूर्वी त्यांनी कुटुंबांचा विरोध डावलून लग्न केले. त्यांना नुकतीच गोंडस कन्या झाली आहे. ती येथील राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील जानकी हॉस्पिटलमध्ये आहे; परंतु दवाखान्याचे बिल द्यायला पैसे नसल्याने त्यांना डिस्चार्ज घेणे अवघड बनले आहे.
‘तोंडावर होळीचा सण आहे, आम्ही कधी हो जाणार गावी’ अशी ती ओली बाळंतीण सर्वांना विचारत आहे. या कुटुंबाला कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने दहा हजारांची मदत केली आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदतीसाठी
पुढे यावे, असे आवाहन येथील आंतरधर्मीय विवाह संस्थेतर्फे मेघा पानसरे यांनी केले आहे.
मुलाच्या वडिलांनी भाचीला सून करून आणायचे ठरविल्याने त्यांचाही या लग्नास विरोध होता. मुलीचे कुटुंबीय तर एकदमच विरोधात. त्यांनी पळून जाऊन लग्न केले. मुलगा रंगारीची कामे करतो. काम मिळेल त्या गावात खोली घेऊन राहायचे, असा त्यांचा संसार. गेली वर्षभर ते बत्तीस शिराळ््यात राहतात. पत्नी गरोदर झाल्यावर त्यांनी स्थानिक रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये या महिलेस काविळ असल्याचे स्पष्ट झाले तेथून ते बांबवडे येथे खुटाळे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पुढील उपचारासाठी येथील जानकी हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठविले. या महिलेची २५ फेब्रुवारीस प्रसूती झाली व तिला मुलगी झाली.
बालिकेची प्रकृती चांगली आहे. परंतु आईस काविळ झाल्याने तिच्यावर उपचार केले. त्यामुळे रुग्णालयाचे बिल ४८ हजार रुपयांवर गेले आहे. त्यांची परिस्थिती माहीत झाल्यामुळे रुग्णालयाने पाच हजार रुपये कमी केले. तिच्या पतीने मित्रमंडळी व कामाच्या लोकांकडून काही रक्कम उभी केली आहे. परंतु ती पुरेशी नाही. पैसे देता येत नाही म्हणून त्यांना डिस्चार्ज घेता आलेला नाही.
बाळंतिणीजवळ ओळखीची महिला रोजगार बुडवून राहिली आहे. त्यांनाही घरी जायचे आहे. विवाहास विरोध असल्याने दोन्ही कुटुंबे मदत करायला तयार नाहीत. आंतरधर्मीय विवाह केंद्रामार्फतही काही निधी गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.