हातकणंगले मतदारसंघात अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग; कोरे-आवाडे-यड्रावकर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:11 PM2024-04-12T16:11:27+5:302024-04-12T16:13:58+5:30
तिघांमध्ये नेमकी काय खलबत्ते सुरू आहेत, याबाबत चर्चेला उधाण
इचलकरंजी : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराबरोबरच इतर अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. बुधवारी (दि.१०) रात्री आमदार विनय कोरे यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे ते सांगत असले तरी त्यांच्यात तब्बल एक तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर आमदार आवाडे यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यातही मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाल्याचे खात्रीलायक समजते. त्यामुळे या तिघांमध्ये नेमकी काय खलबत्ते सुरू आहेत, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असले तरी त्यांनी अद्याप नेमकी भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार आवाडे आणि आमदार कोरे यांच्यात तब्बल पाऊण तास चर्चा झाल्याचे समजते. मात्र, याचा तपशील मिळाला नाही.
या चर्चेवेळी आवाडे कुटुंबीय वगळता बाहेरचे कोणीही नव्हते. त्यानंतर आवाडे यांनी रात्री उशिरा यड्रावकर यांची भेट घेतली. त्यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर आवाडे मध्यरात्री घरी परतले. त्यांच्यात कोणती चर्चा झाली, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. या मतदारसंघात कोरे, यड्रावकर, आवाडे या तीनही आमदारांची मोठी ताकद आहे. त्यामुळे हे तिघे नेमकी कोणती भूमिका घेणार, याबाबत चर्चा होत असताना या तिघांची भेट झाल्याने आणखी काही वेगळे स्वरूप प्राप्त होणार काय, याकडे लक्ष लागले आहे.
राहुल आवाडे - विनय कोरे भेट
आमदार आवाडे आणि कोरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर गुरुवारी दुपारी राहुल आवाडे यांनी पुन्हा कोरे यांची वारणानगर येथे भेट घेतली. या भेटीमुळेही पुन्हा चर्चेला ऊत आला आहे. ते कोणती भूमिका जाहीर करणार, याकडेही लक्ष लागले आहे.