हुपरीत शुक्रवारपासून आंतरराष्ट्रीय परिषद
By admin | Published: December 2, 2015 01:07 AM2015-12-02T01:07:27+5:302015-12-02T01:07:41+5:30
शेंडुरे महाविद्यालयात आयोजन : चार देशांतील प्राध्यापक येणार
हुपरी : रयत शिक्षण संस्थेच्या येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे महाविद्यालयाच्या ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षानिमित्त शुक्रवार (दि. ४) व शनिवार (दि. ५) हे दोन दिवस ‘बिझनेस मॅनेजमेंट इन्फरमेशन सिस्टम अॅण्ड सोशल सायन्सेस : ए निड फॉर २०२०’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
या परिषदेमध्ये आॅस्ट्रेलिया, इराण, इराक, श्रीलंकेसह दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, आदी राज्यांतील ३५० संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील व परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. व्ही. एन. माने यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.
महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठ यांंच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच ग्रामीण भागात होणार आहे. यावेळी जागतिकीकरणाच्या संदर्भात बिझनेस मॅनेजमेंट इन्फॉरमेशन्स सिस्टम, सोशल सायन्स आणि भाषा व साहित्य या विषयावर शोध निबंध सादर केले जाणार आहेत. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ९ वाजता माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी डॉ. महेश जोशी (आर. एम. आय. टी. युनिव्हर्सिटी मेलबर्न, आॅस्ट्रेलिया) डॉ. जी. एस. बत्रा (पंजाब युनिव्हर्सिटी, पतियाला) व
डॉ. के. व्यंकट (दिल्ली) उपस्थित राहणार आहेत. साधन व्यक्ती म्हणून डॉ. एस. एस. वेर्णेकर (अधिष्ठाता आय. एम. इ. डी., पुणे) डॉ. अविनाश पाटील (कोल्हापूर), कृष्णा गावडे (किर्लोस्कर गु्रप), आदी मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी होणाऱ्या समारोपाचे पाहुणे म्हणून प्रा. जे. एफ. पाटील उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रा. डॉ. भालबा विभुते आहेत. पत्रकार परिषदेत प्रा. संदीप किर्दत, प्रा. संजय साठे, प्रा. विनोद अवघडे, आदी उपस्थित होते.