आंतरराष्ट्रीय चालक परवान्याचा टक्का वाढला
By admin | Published: June 30, 2016 12:36 AM2016-06-30T00:36:41+5:302016-06-30T01:09:09+5:30
परदेशात ड्रायव्हिंगचा मोह : वर्षभरात १९३ जणांनी काढले परवाने; २१ महिलांचाही समावेश
सचिन भोसले --कोल्हापूर --नोकरी, शिक्षण वा परदेशी पाल्यांकडे जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. परदेशातही गेल्यानंतर गाडी चालविण्याचा मोह काहींना होतो. अशावेळी ड्रायव्हिंग लायसेन्सची कमतरता भासते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय चालक परवाना काढणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या वर्षभरात १९३ जणांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये असे आंतरराष्ट्रीय परवाने काढले आहेत. परदेशात गेल्यानंतर तेथील चकाचक रस्ते पाहून काहीजणांना तेथे कार वा दुचाकी चालविण्याचा मोह आवरत नाही. यासाठी मग तेथील कायद्यानुसार चालक परवाना अत्यंन आवश्यक आहे. अशावेळी तेथील कायदे कडक असल्याने तेथे परवाना काढताना बाहेरील देशातील नागरिकांची दमछाक होते. असे परवाने आपल्या देशातील ज्या-त्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मिळण्याची सोय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चालक परवाना काढण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. कोल्हापुरातही गेल्या वर्षभरात १९३ जणांनी असे परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काढून घेतले. त्यात १७२ पुरुष, तर २१ महिलांचा समावेश आहे. हे परवाने केवळ एक वर्षासाठीच दिले जातात. त्यानंतर पुन्हा या परवाने नूतनीकरण करावे लागतात. या परवान्याकरीता पासपोर्ट, व्हिसा, नियमित दुचाकी, चारचाकी ड्रायव्हिंग लायसेन्स आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. विशेष म्हणजे सन २०१३-१४ (७८), तर २०१४-१५ या वर्षी आंतरराष्ट्रीय चालकपरवाना काढण्याचे प्रमाण १४० इतके होते . परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याने परवाना काढणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
गेल्या काही वर्षांत परदेशात शिक्षण, नोकरी आणि आधीच नोकरीत असलेल्या पाल्यांकडे राहायला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यापूर्वी पुणे, मुंबई येथून परदेशी जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, अभियांत्रिकी, संगणक आदी उच्च शिक्षणामुळे अमेरिका, जर्मन, जपान, चीन, फ्रान्स, आदी देशात नोकरीला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तेथील कायद्यानुसार वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. मग अशावेळी तेथे परवाना काढणे अशक्य होते. हीच सोय भारतातही त्या-त्या ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे आहे. त्यानुसारच कोल्हापुरातही १९३ जणांनी असे आंतरराष्ट्रीय चालक परवाना काढले आहेत.
- राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी