कोल्हापूरच्या शाहू मानेचा कोरियात डंका, विश्व नेमबाजीत सुवर्ण पदकाला गवसणी
By सचिन भोसले | Published: July 13, 2022 04:27 PM2022-07-13T16:27:13+5:302022-07-13T16:28:46+5:30
शाहू व मेहुली यांनी यापूर्वीच्या स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर उत्कृष्ट खेळी करीत १७ विरूध्द १३ अशी मात करीत सुवर्ण पदक जिंकले.
सचिन भोसले
कोल्हापूर : कोरिया (चांगवान) येथे सुरू असलेल्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना मेहुली घोष हिच्या साथीने १० मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारामधे सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
पात्रता फेरी त शाहू व मेहुलीने सहभागी ३० संघातील स्पर्धकांमधे सर्वाधिक ६३४:३ गुण पटकावत प्रथम, तर हंगेरीयन संघाने ६३०:३ गुण घेऊन पात्रता फेरीत द्वितीय स्थान पटकावले. अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धक हंगेरी संघामधील ऑलिंपियन ईस्तवान पेनी व ईस्तर मेसझारोस हे दोघे भारतीय खेळाडूंपेक्षा अनुभवी असलेने त्याचेकडून चांगली सुरवात झाली. मात्र, शाहू व मेहुली यांनी यापूर्वीच्या स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर उत्कृष्ट खेळी करीत १७ विरूध्द १३ अशी मात करीत सुवर्ण पदक जिंकले.
भारतीय संघाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या प्रशिक्षिका सुमा शिरुर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्य शाहू कडून ही मला भेट मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
शाहू हा केआयटी कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. त्याला संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. व्ही व्ही कार्जीन्नि, प्रभारी संचालक डॉ्.एम एम मुजुमदार, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर आदींचे प्रोत्साहन लाभले.