International Women's Day 2023: महिलांना विश्रांती; पुरुष करणार स्वयंपाक, कोल्हापुरातील 'या' पंचायतीची नवी संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:25 PM2023-03-08T12:25:09+5:302023-03-08T12:25:42+5:30
पुरुष मंडळींनी महिला दिनादिवशी स्वयंपाकघर सांभाळावे
जहाँगीर शेख
कागल : कागल पंचायत समितीच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एक वेगळीच संकल्पना घेऊन या वर्षीचा महिला दिन साजरा करण्यात येत आहे. महिला दिनादिवशी एक दिवस घरातील पुरुष मंडळींनी जेवण बनवावे आणि महिलांना एक दिवस या कामातून सुट्टी द्यावी, असे हे आवाहन केले असून त्यासाठी गावांनी पुढाकार घ्यावा म्हणून ग्रामपंचायतींना पत्रे पाठविली आहेत. स्त्रीच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, असा या उपक्रमामागील हेतू आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि प्रशासक सुशीलकुमार संसारे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. महिला दिनादिवशी गावात विविध उपक्रम घ्यावेत; पण एक दिवसासाठी महिलांना स्वयंपाकापासून बाजूला ठेवून स्वत: पती अथवा मुलांनी जेवण बनवावे. फार नाही झाले तरी किमान चहा तरी आपल्या हातचा करून पत्नीला द्यावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी बाहेरून तयार जेवण आणावे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन सामुदायिक जेवण करावे. होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम आयोजित करावेत, अशाही सूचना केल्या आहेत.
यातील महत्त्वाचा मुद्दा घरातील पुरुष मंडळींनी महिला दिनादिवशी स्वयंपाकघर सांभाळावे हा आहे. पंचायत समितीशी संबंधीत घटक या संकल्पनेचे महत्त्व गावोगावी सांगत आहेत. आता या अभिनव संकल्पनेस किती प्रतिसाद मिळणार आणि राजकीयदृष्ट्या जागरुक तालुका महिलांच्या श्रमाचे किती मोल करणार याबद्दल उत्सुकता आहे.
महिला गृहिणी असो अथवा नोकरी करणारी असो. स्वयंपाक ही तिचीच जबाबदारी असते. आणि याबद्दल तिच्या मनात कधीही नकारात्मक भावनाही नसते. मात्र, एक दिवस यातून त्यांना विश्रांती दिली तर त्यांना महिला दिनाची एक आठवण वर्षभर राहील आणि यातून कौटुंबिक स्नेहही आणखीन वृद्धिंगत होईल. - सुशीलकुमार संसारे, गटविकास अधिकारी कागल
होय, मी दोन वेळचा स्वयंपाक करणार
करनूर (ता. कागल) येथील कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत एका पत्राद्वारे पंचायत समितीचे अभिनंदन केले आहे. मी यादिवशी दोन्ही वेळचे जेवण करून पत्नी व सुनेला महिला दिनाची भेट देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. महिला दिन यातून घरोघरी पोहचेल, असेही त्यांनी म्हटले आहे.