कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद, पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:52 PM2023-06-07T13:52:18+5:302023-06-07T14:03:34+5:30
कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात आज, बुधवार (दि.७) सकाळपासून मोठा तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी ...
कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात आज, बुधवार (दि.७) सकाळपासून मोठा तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्याकडून अनेक दुकानगाळे, हातगाड्या, दुचाकी तसेच काही परिसरात मोठी तोडफोड केली आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराच्या कांड्याही फोडल्या आहेत. तसेच दगडफेक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशातच सोशल मीडियावरील अफवावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरात एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून लोक सुरक्षेसाठी दूरसंचार सेवा (इंटरनेट) तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आली. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा आज, ७ जून सायंकाळपासून ते ८ जून 2023 रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ३१ तासांच्या कालावधीकरिता खंडीत करण्याचे आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी दिले. खबरदारीचा उपाय म्हणून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा आदेश पारित करण्यात आला असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
सध्या शहरात तणाव असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
तर, आक्षेपार्ह स्टेटसवरुन निर्माण झालेल्या गोंधळा प्रकरणी ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात काही जण जखमी देखील झाले आहेत.
जिल्हावासियांना संयम पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आपला देश लोकशाही पाळणारा असून सर्वांनी शांतता राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे देखील आवाहन केले. सोशल मीडियावर अफवापासून नागरिकांनी सावध राहावे. दोन्ही समाज्यातील नेत्यांसोबत चर्चा करुन हा प्रश्न शांततेने सोडवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने तणावाचे वातावरण बनले. बिंदू चौक, अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड या परिसरात यावेळी जमावाकडून तोडफोड करण्यात आली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत अश्रूधुर कांड्या फोडल्या. जमाव सैरभैर झाल्याने परिस्थिती आवाक्या बाहेर गेली आहे. शहरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवले आहे. दरम्यान, तणावामुळे शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह, सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.