शाहू राजांच्या पुतळ्याला अंतराचा अडथळा

By admin | Published: May 9, 2017 01:10 AM2017-05-09T01:10:16+5:302017-05-09T01:10:16+5:30

जिल्हा परिषदेसमोर प्रस्तावित : शासनाच्या नव्या नियमाची अडचण; एकाच व्यक्तीचा दोन किलोमीटरमध्ये पुतळा नको

Interruption of the statue of Shahu kings | शाहू राजांच्या पुतळ्याला अंतराचा अडथळा

शाहू राजांच्या पुतळ्याला अंतराचा अडथळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क   कोल्हापूर : जिल्हा परिषदेसमोर उभारण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अंतराचा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाच्या नव्या नियमानुसार एकाच महनीय व्यक्तीचा पुतळा दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये बसविण्यात येऊ नये, असा स्पष्ट आदेश असल्याने या कामामध्ये मोठी अडचण आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी दोन महिन्यांपूर्वी या पुतळ्याची कल्पना मांडली. त्यांनीच निधी संकलनासाठीची यंत्रणा कामाला लावली. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मोठ्या देणग्याही जाहीर केल्या. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांकडूनही निधी संकलन करण्यात येणार असून एकूण सुमारे ३० लाख रुपये संकलित करण्याचे नियोजन होते. २५ लाखांपर्यंत पुतळा उभारणीसाठी खर्च करून उर्वरित निधीतून देखभाल-दुरूस्ती करायची तसेच त्या रकमेतून एखादी शिष्यवृत्ती देता येते का, असे नियोजन करण्यात येणार होते.
३० नोव्हेंबर २०१६ च्या सर्वसाधारण सभेमध्ये शशिकांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा बांधकाम उपसमितीही तयार करण्यात आली. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, विषय समित्यांचे सभापती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे या समितीचे सचिव आहेत. शिये येथील शिल्पकार संताजी चौगले यांना पुतळा तयार करण्याचे काम देण्याचा धोरणात्मक निर्णयही झाला.
ही समिती स्थापन करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत महानगरपालिका, पोलिस प्रशासन आणि सरकारी वकील यांचे ‘ना हरकत दाखले’ घेण्यात आले आणि महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीसाठी २९ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला. दरम्यान, जिल्हा परिषदेची निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याआधी दोन दिवस आधी भूमिपूजनही करून घेण्यात आले; परंतु नंतर निवडणुकीमुळे हा विषय मागे पडला. सर्वच पदाधिकारी आणि सदस्य निवडणुकीत गुंतल्याने निधी संकलनास सुरुवात झाली नाही.

आचारसंहितेमुळे प्रस्तावाला विलंब
जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी हा प्रस्ताव स्थगित ठेवला होता. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली असताना आणि आचारसंहिता सुरू असताना ‘सकारात्मक’ शेरा मारून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवणे त्यांना उचित वाटले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचा निकाल लागलेल्या दिवशीच त्यांनी याबाबत बैठक लावली. पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कलासंचालनालयाची परवानगी घेणे आणि एकूणच आराखड्याला मुख्य वास्तुविशारदांची परवानगी घेतल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असे सैनी यांनी स्पष्ट केले होते.


राधानगरी धरणस्थळावरील प्रकल्पाला अडचण नाही
राधानगरी येथील धरणस्थळावरही माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांच्या पुढाकारातून शाहूसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, या ठिकाणी पुतळा न उभारता म्युरल्स उभारण्यात येणार असल्याने तेथे काही अडचण नसल्याचे सांगण्यात आले.


नवा आदेश आला अन्...
अशातच २ मे रोजी शासनाने नवा आदेश काढून पुतळा उभारणीसाठी २१ अटींच्या पूर्ततेची सक्ती केली. त्यामध्ये २१ व्या क्रमांकाची अंतराची अट आहे ती शाहू पुतळ्यासाठी अडचणीची ठरली आहे. एखाद्या महनीय व्यक्तीचा पुतळा हा त्याच व्यक्तीच्या अन्य पुतळ्यापासून २ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरावर असू नये, अशी ही अट आहे.
जिल्हा परिषदेपासून दसरा चौकातील शाहू पुतळ्याचे हवाई अंतर हे ५०० मीटर भरले आहे. आजूबाजूनेही हे अंतर मोजले तरी ते सव्वा किलोमीटरच्या आतच भरते त्यामुळे हा पुतळा उभारण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Web Title: Interruption of the statue of Shahu kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.