आंतरराज्य टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 01:17 AM2016-10-17T01:17:52+5:302016-10-17T01:17:52+5:30
साडेचार लाखांचा माल जप्त : सांगली, निपाणी परिसरातही चोऱ्या
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, निपाणी परिसरात जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व मोटारसायकली चोरी करणाऱ्या कुख्यात आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चार मोटारसायकली, दहा तोळे सोने, चार मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित आरोपी गणेश रतन नवले (वय २५), संदीप चंद्रकांत सोनवणे (२८, दोघे रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले), प्रशांत तानाजी ननवरे (२१, रा. निमशिरगाव, ता. शिरोळ), विकास काशीनाथ नाईक (२४, रा. नागाव, ता. हातकणंगले), अरुण रामू चव्हाण (२८, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुणे-बंगलोर महामार्गावर २६ सप्टेंबरला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक शावीर दिलीप गायकवाड (३८, रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) हा कोचीला निघाला होता. कागल येथे चढतीला ट्रक हळूहळू निघाल्यानंतर चौघाजणांनी ट्रकच्या दोन्ही बाजंूनी चढून चालक गायकवाड याच्यावर खुनी हल्ला करून त्याच्याजवळील पैसे व मोबाईल चोरून नेला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस तपास करीत असताना पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत ननवरे व गणेश नवले यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने कोल्हापूर, सांगली, निपाणी परिसरात मोटारसायकल चोरीसह लुटमारीचे गुन्हे केल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार रविवारी वडगाव व शिरोली एमआयडीसी येथे दोन्ही पथकांनी सापळा रचून संशयिताना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत जिल्ह्यात महामार्गावर तीन लुटमारी, एक मोटारसायकल चोरी, चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे, सांगली येथे एक मोटारसायकल व निपाणी येथून दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. संशयित हे रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वारांना अडवून चाकूचा धाक दाखवून लुटमार करीत होते. त्यांना आज, सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, सहायक पोलिस निरीक्षक इलियास सय्यद, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, युवराज आठरे व कर्मचारी उपस्थित होते.
कारागृहातच गँग स्थापन
गणेश नवले व संदीप सोनवणे हे दोघे चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये बिंदू चौक कारागृहात कच्चे कैदी म्हणून काही महिने राहिले. यावेळी त्यांची प्रशांत ननवरे, विकास नाईक व अरुण चव्हाण यांच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांनी कारागृहातच गँग तयार केली. बाहेर पडल्यानंतर लुटमार व चोरीचे गुन्हे करूलागले.