चर्चेतील मुलाखत... संगणकीय सहाय्यामुळे मेंदू शस्त्रक्रियेमध्ये अचुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:26+5:302021-08-15T04:25:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क देश-विदेशातून मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी नागरिक कोल्हापूरमध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. याचे श्रेय जाते विख्यात न्यूरो सर्जन डॉ. ...

Interview in discussion ... Accuracy in brain surgery due to computer aided | चर्चेतील मुलाखत... संगणकीय सहाय्यामुळे मेंदू शस्त्रक्रियेमध्ये अचुकता

चर्चेतील मुलाखत... संगणकीय सहाय्यामुळे मेंदू शस्त्रक्रियेमध्ये अचुकता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

देश-विदेशातून मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी नागरिक कोल्हापूरमध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. याचे श्रेय जाते विख्यात न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू यांना. केवळ मेंदू आणि मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी १०० खाटांचे एकमेव रूग्णालय त्यांनी कोल्हापूरमध्ये उभारले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा गौरव म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. डॉ. प्रभू यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न - कोल्हापूरमधील मेंदूवरील शस्त्रक्रियांबाबतची परिस्थिती कशी होती?

उत्तर - मी जर्मनी येथे मायक्रोसर्जरीचे प्रशिक्षण घेऊन १९९१ साली कोल्हापूरमध्ये आलो. तोपर्यंत या शस्त्रक्रिया कोल्हापूरमध्ये होत नव्हत्या. यासाठी शक्यतो मुंबई किंवा बेंगलोरला रूग्णाला पाठवावे लागत होते. महाराणा प्रताप चौकामध्ये मी रूग्णालय सुरू केल्यानंतर अशाप्रकारच्या शस्त्रक्रियांना सुरूवात केली.

प्रश्न - या शस्त्रक्रियांचे स्वरूप कसे असते?

उत्तर - अपघातामुळे मेंदूला मार लागलेला असतो. त्यामुळे या पद्धतीच्या शस्त्रक्रिया वेगळ्या असतात. मेंदूला कुठे आणि कितपत मार लागला आहे, त्यावर या शस्त्रक्रियांचे स्वरूप अवलंबून असते. दुसऱ्या बाजूला मेंदूवर जाळ्या आच्छादणे, मेंदूतील रक्तवाहिन्यांना फुगा येणे, चेहऱ्यावर वेदना होणे, पार्किन्सन अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केली. १९९८-९९ला अशाप्रकारच्या फंक्शनल शस्त्रक्रिया सुरू केल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रूग्णांच्या व्याधी दूर करण्यास मदत झाली.

प्रश्न - या शस्त्रक्रियांमध्ये संगणकाचा वापर कसा होतो?

उत्तर - मेंदू हा शरिरातील सर्वांत किचकट आणि अतिमहत्त्वाचा असा भाग आहे. शरिराचे संपूर्ण नियंत्रण मेंदूच्या माध्यमातून होत असल्याने याठिकाणी शस्त्रक्रिया करताना यातील दुसऱ्या नियंत्रण केंद्राला धक्का लागला तर त्याचा फटका रूग्णाला बसू शकतो. त्यामुळे या शस्त्रक्रिया जिकरीच्या असतात. २००७ साली आपल्या रूग्णालयात कॉम्प्युटर गायडेड नॅव्हिगेशनच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात झाली. ज्याचा अचूकतेसाठी खूप मोठा फायदा झाला.

प्रश्न - संगणकीय यंत्रणेचा आणखी काय उपयोग होतो?

उत्तर - मेंदूमध्ये तोंड, कान, नाक, घसा, हात, पाय या सगळ्याचे नियंत्रण करणारी केंद्रे असतात. आता शस्त्रक्रिया करताना चुकूनही दुसऱ्या बाजूच्या नसांवर त्याचा विपरीत परिणाम होत असेल तर लगेच आम्हाला या यंत्रणेच्या सहाय्याने माहिती मिळते. त्यामुळे संभाव्य नुकसान थांबते. त्यामुळे रूग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. आता ‘विन्स’मध्ये राेबोटिक आर्म गायडेड सर्जरीचीही सोय करण्यात आली आहे.

प्रश्न - सध्या मेंदूवरील शस्त्रक्रियांबाबत जगभरात नवीन संशोधन काय सुरू आहे?

उत्तर - ‘सायबर नाईफ’ हे तंत्र आता विकसित केले जात आहे. रेडिएशन बीमच्याव्दारे मेंदूतील गाठी विरघळवल्या जातात. अजूनही हे तंत्र आपल्याकडे वापरण्यात येत नाही. परंतु, नजिकच्या काळात त्याचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रश्न - ‘विन्स’ची उभारणी कधी केली?

उत्तर - एकतर मेंदू आणि मणक्यावरील शस्त्रक्रियांसाठी वाढत्या संख्येने रूग्ण येत होते. कोल्हापूरमध्ये मध्यभागी असणारे डॉ. प्रभू हॅास्पिटल अपुरे पडू लागले. म्हणून मग महावीर महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस ‘विन्स’ या १०० खाटांच्या रूग्णालयाची उभारणी केली.

प्रश्न - काही वैशिष्ट्यपूर्ण अशा शस्त्रक्रिया केल्या आहेत का?

उत्तर - वेगळ्या अशा २८ वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रिया ‘विन्स’मध्ये करण्यात आल्या आहेत. इंग्लंडमधून आलेला रूग्ण. त्याच्या मेंदूतील राग येणाऱ्या आणि त्याला अस्वस्थ करणाऱ्या पेशी काढून टाकल्या आणि आता तो सर्वसाधारण छान आयुष्य जगत आहे.

प्रश्न - काही नवीन योजना आहेत का?

उत्तर - या रूग्णालयाच्या शेजारीच दहा मजली मल्टिस्पेशालिटी रूग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. सर्व आजार आणि रोगांवर ते उपचार करणारे असेल. एका बाजूला मेंदू आणि मणक्यावरील उपचार, शस्त्रक्रिया आणि नव्या रूग्णालयात अन्य सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार होतील, असे हे आरोग्य संकुल असेल.

प्रश्न - पुराचा काही फटका बसला का?

उत्तर - २०१९च्या पुरानंतर आम्ही दक्ष राहिलो. आमच्या रूग्णालयाचा स्वत:चा ऑक्सिजन प्लान्ट आहे. आमची मोटारबोट आहे. त्यामुळे नुकत्याच आलेल्या पुराच्या काळात आम्ही कुठेही बाहेर गेलो नाही. ‘विन्स’मध्ये ३५ रूग्ण त्यांचे ५० नातेवाईक आणि आम्ही ४० डॉक्टर्स, कर्मचारी असे १२५ जण होतो. सर्व उपचार नेहमीप्रमाणे सुरू होते. त्यामुळे रूग्णालयाच्या भोवती पाणी आले परंतु रूग्णांना त्याचा काही त्रास झाला नाही.

१४०८२०२१ कोल डॉ. संतोष प्रभू

Web Title: Interview in discussion ... Accuracy in brain surgery due to computer aided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.