हसन मुश्रीफ मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:42+5:302021-04-21T04:23:42+5:30
माझ्या जीवनाचे सार्थक झालं पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन गेली ४० वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कणखरपणे उभा असलेले नेतृत्व म्हणून ...
माझ्या जीवनाचे सार्थक झालं
पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन गेली ४० वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कणखरपणे उभा असलेले नेतृत्व म्हणून राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्यकर्तृत्वातून सामान्य माणसाने त्यांना अनेक उपमा दिलेल्या आहेत. कोण गोरगरिबांचा श्रावण बाळ म्हणतो, तर काहीजण आपले दैवत मानतो, अशा सामान्य माणसांच्या खऱ्याअर्थाने हृदयात असलेल्या नेतृत्वाचा आज वाढदिवस, त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.....
प्रश्न : सामान्य माणसाने आपणाला ‘गोरगरिबांचा श्रावणबाळ’ अशी उपमा दिली आहे.
उत्तर : आजपर्यंतच्या ४० वर्षांच्या राजकारणात गोरगरीब, सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम केले. माझे जीवनच सामान्य माणसाशी जोडले आहे. पंचायत समिती, जिल्हा बँक, आमदारकी असो अथवा मंत्रिपद ही सगळी पदे सामान्य माणसांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी पणास लावली. त्यामुळेच जनतेच्या नजरेत आपल्याबद्दल श्रावणबाळाची प्रतिमा तयार झाली असावी.
प्रश्न : मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर आपण कोणती उठावदार कामे केली?
उत्तर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माझे दैवत आदरणीय शरद पवार यांच्या आशीर्वादाने २१ वर्षे या राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील माणसावर त्यांनी दाखविलेला विश्वास तितक्याच तडफेने सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला. विधि व न्याय खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यातील बारकावे शोधून त्याचा सामान्य माणसांसाठी काय उपयोग करता येईल, हे पाहिले. त्यातूनच गोरगरीब रुग्णांवर मुंबईतील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची योजना सुरू केली. त्यातून आतापर्यंत हजारो गरजूंवर उपचार करता आले. विशेष खात्याच्या माध्यमातून विधवा, परित्यक्त्या व ६५ वर्षांवरील निराधार, अपंगांना कायदा बदलून हजार रुपये पेन्शन सुरू केली. हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे काम केले.
प्रश्न : आपल्या कार्यकर्तृत्वातून अनेक लहान खाती वजनदार बनली?
उत्तर- कोणतेही खाते लहान नसते, ते सामान्य माणसाशी निगडित असते. मी फक्त त्यात झोकून देऊन काम केले. कामगारमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर घरेलू कामगार, बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरू केल्या. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अकरा हजार कोटींचा निधी आहे, त्याच्या व्याजातून अनेक योजना राबविल्या. त्यामुळे पक्षनेतृत्व देईल त्या संधीचे साेने करत सामान्य माणसाच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
प्रश्न : कामगार खात्याची नव्याने जबाबदारी मिळाली आहे, काही नवीन योजना राबविणार का?
उत्तर : मागील पाच वर्षांत या खात्याच्या योजनांना गती मिळणे अपेक्षित होते, ती मिळाली नाही. राज्यात साडेचार लाख घरेलू कामगार होत्या. मात्र, त्यांची पुनर्नोंदणी न झाल्याने आता केवळ एक लाखच घरेलू कामगारांना लाभ मिळतो. त्यांची नोंदणी करून त्यांनाही लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी जाऊन दोनवेळचे जेवण दिले जाणार आहे. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करणार आहे. दर पंधरा दिवसाला आर्टिफिसियल चाचणी करणार आहे.
प्रश्न : स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी ‘ग्रामविकास’ खाते सर्वोच्च स्थानी पोहोचवले, आपण काय करणार आहात?
उत्तर : आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास खात्याला वेगळी झळाळी दिली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करायचे आहे. खरंच मी नशीबवान आहे, केंद्र सरकारकडून पाच वर्षांत २९ हजार कोटींची वित्त आयोगापोटी रक्कम महाराष्ट्राला मिळणार आहे. त्यातील ५० टक्के पाणीपुरवठा व स्वच्छतेवर खर्च करायचे आहे, तर उर्वरित विकासकामांना वापरता येणार आहे. त्यामुळे गावांचा चेहरामोहरा बदलण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याची सुरुवात केली असून येत्या चार वर्षांत आपणाला खऱ्या अर्थाने खेडी समृद्ध झाल्याचे पहावयास मिळतील.
प्रश्न : केंद्राकडून ग्रामविकासासाठी मोठा निधी मिळणार आहे, त्याचे नियोजन कसे?
उत्तर : सध्या कोरोनाचे संकट आहे. आणखी किती वर्षे असे राहणार कोणाला माहिती नाही. रुग्णांना ऑक्सिजन, बेड मिळत नसल्याने हेळसांड होत आहे. यासाठी नगरपालिका व गावात छोटे हवेतून ऑक्सिजन ओढून घेणारे प्रकल्प व छोटे-छोटे दहा सिलिंडरचे दवाखाने उभा करायचे आहेत. त्याचबरोबर विद्युतदाहिनी आदींचे नियोजन करणार आहे. सोलरवर गावातील स्ट्रीट लाईट, साेलरवरील पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे आपले ध्येय आहे.
प्रश्न : सहकारातही आपण उठावदार काम केले आहे?
उत्तर : खरे आहे, दोन्ही साखर कारखान्यांतून बाहेर जावे लागले, तरी थांबलो नाही. जनतेच्या सहकार्यातून नवीन साखर कारखाना काढला. जनतेने जी जबाबदारी सोपवली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तीस-चाळीस वर्षे पहाटे साडेपाचला उठणे, गाठीभेटी, जनतेची कामे केली. जिल्हा बँक राज्यात अव्वल बनवली. जे करायचे ते सामान्य माणसासाठीच करायचे, या निर्धाराने आतापर्यंत काम केले. परमेश्वर कृपेने यापुढेही जनतेची सेवा करण्याची ताकद आपणास द्यावी.
- राजाराम लोंढे