कुलगुरुपदासाठी अकरा जणांच्या मुलाखती
By admin | Published: June 4, 2015 11:44 PM2015-06-04T23:44:16+5:302015-06-05T00:19:21+5:30
शिवाजी विद्यापीठ : त्रिसदस्यीय समितीकडून मुंबईत प्रक्रिया
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी मुलाखतीच्या पहिल्या टप्प्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहामध्ये दिवसभरात अकरा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आज, शुक्रवारी उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती होतील. कुलपती नियुक्त त्रिसदस्यीय समितीकडून मुलाखती घेण्यात येत आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया कुलपती नियुक्त त्रिसदस्यीय समितीतर्फे पूर्ण करण्यात येत आहे. त्यात अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन यांचा, तर उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे, विद्यापीठ प्रतिनिधी रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. या समितीकडे देशभरातून शंभराहून अधिक अर्ज दाखल होते. त्यांची छाननी करून समितीने मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यासाठी १५ उमेदवारांची निवड केली. मुलाखतीची प्रक्रिया दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात त्याची सुरुवात गुरुवारी झाली.
गुरुवारी दिवसभरात दोन सत्रांत ११ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यात सकाळी साडेनऊ ते दुपारी दीडपर्यंत पुणे विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक व्ही. बी. गायकवाड, भूगर्भशास्त्र विभागातील प्रा. नितीन करमळकर, औरंगाबादमधील देवानंद शिंदे, डॉ. के. व्ही. काळे, श्रीनिवास ओमणवार, पी. जी. येवले यांचा तर दुपारी दीडनंतर शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. एम. बी. देशमुख, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. एस. पी. गोविंदवार, डॉ. नामदेव कल्याणकर, विनायक भिसे, पी. पी. माहुलकर यांच्या मुलाखती झाल्या.
उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी सकाळी होतील. त्यात डॉ. किशोर आडाव्ह, सोलापूरचे डॉ. एल. बी. देशमुख, एम. एच. फुलेकर, प्रदीप खोत यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातून अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अंतिम मुलाखतीची प्रक्रिया शनिवारी (दि. ६) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
मुलाखतीसाठी ३० मिनिटांचा वेळ
समितीने प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी ३० मिनिटांचा वेळ दिला होता. त्यात विद्यापीठाच्या विकासाबाबतच्या योजना, नवी संकल्पना आणि व्हिजन याबाबत उमेदवारांशी समिती सदस्यांनी चर्चा केली.