कुलसचिवपदासाठी १९ नोव्हेंबरला मुलाखती
By admin | Published: October 27, 2015 12:48 AM2015-10-27T00:48:44+5:302015-10-27T00:52:53+5:30
लोकमत इम्पॅक्ट : निवड समितीचा निर्णय
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची प्रशासकीय बाजू कुलसचिवपदाच्या माध्यमातून सांभाळली जाते. या पदाची अंतिम निवड प्रक्रिया १९ नोव्हेंबरला होणार आहे. याबाबतचा निर्णय कुलसचिव निवड समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.
कुलसचिव पदासाठीच्या दाखल झालेल्या अर्जांची प्राथमिक टप्प्यातील छाननी होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप मुलाखतीची प्रक्रिया जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला कुलसचिव निवडीला मुहूर्त कधी सापडणार? या बातमीद्वारे ‘लोकमत’ने रविवारच्या (दि. २५) अंकात निवड प्रक्रियेतील दिरंगाई मांडली होती. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने सोमवारी कुलसचिव निवड समितीची बैठक घेतली. यात कुलसचिवपदासाठी अर्ज दाखल केलेल्या २३ उमेदवारांच्या अंतिम मुलाखतीची प्रक्रिया १९ नोव्हेंबरला राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, संबंधित पदासाठी २३ अर्ज दाखल झाले. त्यात विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’चे माजी संचालक डॉ. ए. बी. राजगे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य एल. जी. जाधव, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. वासंती रासम, भौतिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. व्ही. जे. फुलारी, दूर शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव डॉ. नितीन सोनजे, राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी, ‘केआयटी’ कॉलेजचे प्रा. जय बागी, मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिव दिनेश कांबळे, पुण्यातील एम. आर. देशपांडे, आदींचा समावेश असल्याचे समजते.
या पदाच्या निवड प्रक्रियेत कायदेशीर बाबी काळजीपूर्वक पाहाव्या लागतात. त्यानुसार निवड समितीने प्रक्रिया राबविली आहे. अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अंतिम मुलाखतीची प्रक्रिया १९ नोव्हेंबरला राबविण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.
- कुलगुरू देवानंद शिंदे