अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी उद्या पन्हाळ्यावर मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:58+5:302021-07-10T04:17:58+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती उद्या, रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकासमंत्री ...

Interviews at Panhala tomorrow for the post of President, Vice President | अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी उद्या पन्हाळ्यावर मुलाखती

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी उद्या पन्हाळ्यावर मुलाखती

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती उद्या, रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.

या दोन्ही मंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर पाचारण केले होते. या बैठकीसाठी ४१ सदस्य उपस्थित होते. शिवसेनेचे अंबरिश घाटगे आणि काँग्रेसच्या रेश्मा राहुल देसाई या अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सर्व सदस्यांना दोन्ही मंत्र्यांनी सूचना दिल्या. त्यानुसार हे सर्व सदस्य उद्या दुपारपर्यंत पन्हाळ्यावर दाखल होणार आहेत. रविवारी प्रमुख नेतेमंडळी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर सोमवारी नाव निश्चित केले जाणार आहे.

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, सत्ता हाती आल्यानंतर कामे कशी केली जातात हे गेल्या वर्षभरात दाखवून दिले आहे. सर्व सदस्यांना मोठा निधी दिला आहे. चौथ्या मजल्याचे काम सुरू झाले आहे. याआधीच्या शासनाने वित्त आयोगाचा सर्व निधी ग्रामपंचायतींना दिला होता. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनाही दहा, दहा टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. २५१५ मधून अजूनही प्रत्येक सदस्याला दहा लाख रुपये निधी देणार आहे. यावेळी ग्रामविकास विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

या बैठकीला खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी, पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार के. पी. पाटील,चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजू लाटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

विरोधकांना वावच ठेवला नाही

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गेल्यावेळी ज्या पध्दतीने महाविकास आघाडी एकत्र येऊन पदाधिकारी निवड केली, त्याचपध्दतीने आताही निवड होईल. यासाठी सर्व नेतेमंडळी बसून निर्णय घेतील. विरोधकांना यामध्ये फारसा वाव ठेवलेला नाही. त्यामुळे त्यांनाही माझी विनंती आहे की, त्यांनी या निवडी बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे.

चौकट

अध्यक्षपदाबाबत संभ्रम कायम

अध्यक्षपद राष्ट्रवादीला की काँग्रेसला, याचा संभ्रम शुक्रवारीही कायम राहिला. अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, अशी जाहीर घोषणा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांनीच आज पत्रकारांशी बोलताना याबाबत रविवारी सर्व नेतेमंडळी मुलाखती घेतल्यानंतर एकत्र बसून निर्णय घेतील, असे सांगितले. त्यामुळे अध्यक्षपद कोणाकडे, हा संभ्रम कायम राहिला आहे.

०९०७२०२१ कोल झेडपी ०१

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या सदस्यांना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी सूचना केल्या. यावेळी आमदार राजू आवळे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के. पी. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील उपस्थित होते.

०९०७२०२१ कोल झेडपी ०२

महाविकास आघाडीच्या नेत्यांसह यावेळी उपस्थित सर्व सदस्यांचे समूह छायाचित्र घेण्यात आले.

छाया : नसीर अत्तार

Web Title: Interviews at Panhala tomorrow for the post of President, Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.