कुलगुरूपदासाठी मुलाखती पूर्ण
By admin | Published: June 7, 2015 01:02 AM2015-06-07T01:02:21+5:302015-06-07T01:02:21+5:30
पाच उमेदवारांच्या अंतिम मुलाखती शनिवारी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी होणाऱ्या पाच उमेदवारांच्या अंतिम मुलाखती शनिवारी सांयकाळी मुंबईतील राजभवनात पार पडल्या. शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. एस. पी. गोविंदवार यांचा यामध्ये समावेश होता.
विद्यापीठ कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेतील मुलाखतींचा पहिला टप्पा कुलपती नियुक्ती त्रिसदस्यीय समितीने गुरुवारी व शुक्रवारी पूर्ण केला.
या प्रक्रियेत पात्र १५ उमेदवारांचा समावेश होता. त्यातून अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवारांची निवड करून त्यांची नावे कुलपती कार्यालयाला शुक्रवारी सायंकाळी कळविली होते. त्यानुसार शनिवारी सांयकाळी पाच वाजता मुलाखतीस सुरुवात झाली.
या मुलाखतीमध्ये शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. एस. पी. गोविंदवार, औरंगाबादचे प्रा. देवानंद शिंदे, पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील प्रा. नितीन करमळकर, सोलापूरचे डॉ. एल. बी. देशमुख, नांदेडचे प्रा. नामदेव कल्याणकर यांचा समावेश होता.
कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेचा अंतिम टप्प्याही पूर्ण झाल्याने कुलगुरू पदासाठी कुणाचे नाव निश्चित होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)