बोलोली उपकेंद्राची चौकशी करा
By Admin | Published: June 26, 2015 12:10 AM2015-06-26T00:10:57+5:302015-06-26T00:10:57+5:30
राजेंद्र सूर्यवंशी यांची मागणी : करवीर पंचायत समिती सभा
'कसबा बावडा : वीज महामंडळाकडून गतसाली बोलोली येथे उपकेंद्र उभारले आहे. या उपकेंद्राचे निकृष्ट कामकाज झाले असून, वारंवार तारा तुटतात, खांब वाकतात, ट्रान्फॉर्मर जळतात आणि विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. अध्यक्षस्थानी सभापती पूनम जाधव होत्या. या सभेत शिक्षण विभागाला धारेवर धरण्यात आले.
नागदेववाडीच्या शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षक असे दोन गट असून, शिक्षक हाणामारीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे पटसंख्या कमी झाली आहे. शाळेचा दर्जा चांगला राहण्यासाठी मुख्याध्यापक व काही शिक्षकांना निलंबित करा, अशी मागणी तानाजी आंग्रे यांनी केली. दिलीप टिपुगडे यांनी, या शाळेचे मुख्याध्यापक मग्रूर असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी केली. गटशिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले.
शालेय पोषण आहारावर महिन्याला ३० ते ३५ लाख रुपये खर्च केले जातात; मात्र दिलेल्या नमुन्याप्रमाणे पोषण आहार येत नाही. पोषण आहार पुरविणाऱ्या महाराष्ट्र फेडरेशनने त्यात सुधारणा न केल्यास आवाज उठवू, असा इशारा राजेंद्र सूर्यवंशी, तानाजी आंग्रे यांनी दिला. शिंगणापूर शाळेच्या खोल्या बांधकामाचे काय झाले, असा सवाल दीपा आवळे यांनी केला. सादळे शाळेत शिक्षक नाहीत. या शाळेला पुरेशा प्रमाणात कधी शिक्षक मिळणार, अशी विचारणा जयसिंग काशीद यांनी केली. शाळेला शिपाई मिळत नाहीत. शिपाई मिळविण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळा एक दिवस बंद ठेवूया, अशी सूचना भुजगोंडा पाटील यांनी केली.
पावसाला सुरुवात झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व प्रकारची औषधे पुरेशा प्रमाणात ठेवावी, अशी सूचना राजेंद्र सूर्यवंशी व सचिन पाटील यांनी केली. आंबेवाडी फाटा ते पडळवाडी रस्त्याच्या कडेला मुरूम टाकला आहे. मात्र तो पसरलेला नाही. त्यामुळे अपघात होतात. सार्वजनिक बांधकामने याची दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पंचायत समितीच्या जागेचे काय झाले, असा सवाल भुजगोंडा पाटील यांनी केला. उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी याबाबत लवकरच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची भेट घेऊन त्यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनीही याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. स्मिता गवळी यांनी पाचगावचे रस्ते, पाणी, शाळांच्या इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती या विषयावर आवाज उठविला. (प्रतिनिधी)
शिक्षकांचा मोबाईल जप्त
तालुक्यातील अनेक शाळेत वर्गात शिकविताना काही शिक्षक मोबाईल फोनचा वापर करताना दिसून आले आहे. असे शिक्षक जर तपासणी वेळी एखाद्या सदस्यांना आढळून आले, तर त्यांचा मोबाईल जप्त करण्याचा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
करवीरची इमारत चेष्टेचा विषय
करवीर पंचायत समितीला स्वत:च्या मालकीची इमारत नाही. सभागृहात यावर आवाज उठविला जातो, परंतु त्याचे गांभीर्य कोणीही घेत नाही. कारण इमारत हा विषय आता चेष्टेचा झाला आहे, अशी भावना यावेळी अनेक सदस्यांनी बोलून दाखविली.